१०० वर्षांनंतर मनुष्य परग्रहावर राहायला जाईल : आदमापूर येथे मानकर्यांच्या उपस्थितीत भाकणूक
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
ᘛ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ᘛ
दि ९ एप्रिल २०२१
❢ आदमापुर:: मनुष्याला अठरा तर्हेचे आजार होतील. जगावर आजारांची नवी संकटं येतच राहतील. आजारांवर औषध मिळणार नाहीत. डॉक्टर लोक हात टेकतील. कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल. अतिलोकसंख्या वाढीने जगाची उलथापालथ होईल. 100 वर्षांनंतर मनुष्य परग्रहावर राहायला जाईल, अशी भाकणूक कृष्णात बाबुराव डोणे पुजारी (वाघापूरकर) यांनी केली.❢ श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेत जागरादिवशी पहाटे ही भाकणूक झाली. कोरोना संकटामुळे फक्त मानकरी व अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या उपस्थितीत मंदिरामध्ये झाली.
कृष्णात डोणे - पुजारी यांनी केलेली भाकणूक अशी, ‘मानवनिर्मित विषाणूमुळे जगातल्या विनाशाला प्रारंभ होईल. जगावर आलेले कोरोनाचे संकट कमी होईल. कलियुगात मनुष्याला अल्प आयुष्य लाभेल. हा सगळा मायेचा बाजार हाय, नीती-धर्माला अनुसरून वागशीला तर सुखात ठेवीन.’
भारत - पाकिस्तान संघर्ष सुरू राहील. दोघांत छुपे युद्ध होईल. मराठा सैनिक छातीची ढाल करून लढत राहील. चीन भारतावर आक्रमण करील. सैनिक चीनचा हल्ला परतवून लावतील. अतिरेकी घुसखोरी करतील. मोठे बॉम्बस्फोट करतील. दिवसाढवळ्या दरोडेखोरांकडून लूटमार होईल. देशाच्या, राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या मारतील. राजकारणात लोक देवा-धर्माला विसरून जातील. पैसा न खाणारा सापडणार नाही. सत्तेच्या राजकारणात राजकीय नेता विकत मिळेल. राजकारणात महिलावर्ग आघाडीवर राहील. भ—ष्टाचार उंदड होईल. नेतेमंडळी तुरुंगात जातील. राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल. सीमाभागातील राजकारण ढवळून जाईल. निपाणी भागात मोठा गोंधळ होईल.
ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. वैरण सोन्याची होईल. सांभाळून ठेवा. वैरण - धान्याच्या मोठ्या प्रमाणात चोरी होतील. शेतीसाठी खून पडतील. पैशांच्या जोरावर न्याय मिळेल. कागदाचा घोडा माणसाला खूळ लावेल. जंगलातील पक्षी गावात येईल मनुष्य जंगलात जाईल. मी... मी, तू... तू करू नका. घरातून गेलेला मनुष्य परत घरी येईल, सांगता येत नाही. ठेचंला मरण हाय. मनुष्याचं जगणं धर्माचं, मरण हुकमाचे ठरेल. शिवरायांचा जयजयकार ऐकाल, शिवाजी महाराज जन्माला येतील. भगवा झेंडा राज्य करेल. जगात मानानं मिरवेल. आदमापूर पावन भूमी हाय. इथं सगळ्यांचा न्याय निवाडा होईल. माझ्या दरबारात राजकारण आणशिला मोठी चूक होईल. पश्चाताप होईल, असे वागू नका, एकीने वागा. पिवळ्या भस्माच्या मुठीत कोरोनाला मुठीत घेऊन त्याचा नायनाट करीन.
गुळाला उच्चांकी भाव...
साखरेचा भाव तेजी-मंदीत राहील. गुळाचा भाव उच्चांकी राहील. साखर सम—ाटांची खुर्ची डळमळीत राहील. सीमाप्रश्न राजकीय लोकांच्या फक्त चर्चेत राहील. दागिने, पैसे मनुष्याला घातक होतील. लाकडाची डोरली येतील. लाकूड सोन्याचे होईल. कलियुगात तरुण पिढी वाममार्गाला लागेल. पाण्याचा कप विकत मिळेल. कर्नाटकातील जलाशयाला मोठी भगदाड पडतील. भूभाग जलमय होईल, अशीही भाकणूक डोणे यांनी केली.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*_ᘛ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ᘛ_