महसूल वसुलीत अर्जुनीमोर तालुका गोंदिया जिल्ह्यात अव्वल
तहसीलदार विनोद मेश्राम यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध ता.3 एप्रिल:-
मागील वर्षीच्या तुलनेत महसूल वसुलीचे लक्ष जास्त असूनही आणि कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनलोड मध्ये आर्थिक वर्षाचे जवळपास आठ ते नऊ महिने वाया गेले असले, तरी अर्जुनीमोरगाव तालुक्याने आपले महसूल वसुलीचे उद्दिष्ट 100% पेक्षा जास्त साध्य करून यामहामारीच्या कठीण प्रसंगात शासनाच्या तिजोरीला हातभार लावला आहे. त्या बद्दल जिल्हाधिकारी गोंदिया व उपविभागीय अधिकारी अर्जुनीमोर यांनी अर्जुनीमोरचे तहसीलदार विनोद मेश्राम यांचे अभिनंदन केले आहे.
अर्जुनीमोर तालुक्याला आर्थीक वर्ष 2020-21मध्ये 271.92 एवढे महसूल वसुलीचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले होते.1 एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत प्रपत्र अ मध्ये उद्दिष्ट 69.42 लक्ष रुपये होते,मात्र प्रत्यक्षात वसुली 76.53 लक्ष झाली,याची टक्केवारी 110.24 आहे,प्रपत्र ब उद्दिष्ट 202.50 लक्ष रुपये, तर प्रत्यक्ष वसूली 198.82 लक्ष रुपये, टक्केवारी 98.18 एवढी आहे.,तर प्रपत्र क उद्दिष्ट शून्य आहे.प्रपत्र अबक मिळून 271.92 लक्ष रुपये एवढी निर्धारित उद्दिष्टा पेक्षा 275.35 लक्ष रुपये जास्त वसूली झाली असून,त्याची टक्केवारी 101.26 टक्के एवढी आहे.
विशेष म्हणजे गौण खनिज विषयक प्रपत्र ब चे उद्दिष्ट दोन कोटी पेक्षा जास्त असताना आणि तालुक्यातील एकही घाट लिलावासाठी प्रस्तावित नसतांनाही अवैध गौण खनिजाची उत्खनन आणि वाहतूक प्रकरणात दंडात्मक कारवाई करून, तेही उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सर्व कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्यातील योग्य समन्वयातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यास यश मिळाले आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे महसूल वसुलीच्या बाबतीत अर्जुनी मोरगाव तालुका हा पुर्ण जिल्ह्यामध्ये अव्वल ठरला आहे.अशी माहिती अर्जुनीमोरचे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी दिली आहे.त्यांचे जिल्हाधिकारी दिपककुमार मीना व उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी अभिनंदन केले आहे.
उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले आणि तहसीलदार विनोद मेश्राम यांचे मार्गदर्शन आणि कौशल्यपूर्ण नियोजनाच्या आधारे सर्व क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी यांनी ही मोलाची कामगिरी बजावून, जिल्ह्यात तालुक्याचा बहुमान वाढविला आहे.त्या बद्दल तालुक्यात महसूल विभागाचे अभिनंदन होत आहे.