लाखो रुपयांचे व्याजाचे नुकसान
सेवानिवृत्त शिक्षकांना व्याजाची भरपाई कोण देणार?
बदली प्रवास भत्ता देयके 5 वर्षांपासून प्रलंबित
नागपूर- जिल्हा परिषदेच्या तेराही पं स मधील गेल्या एक -दीड वर्षांपासून शेकडो प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख,शिक्षण विस्तार अधिकारी यांना सेवानिवृत्ती नंतर मिळणारे आर्थिक लाभाची प्रत्येकाची 25 ते 30 लाखाची रक्कम जिल्हा परिषदेकडे थकीत असल्याची तक्रार सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या जिल्हा शाखेकडे करण्यात आली आहे.
सेवानिवृत्त झालेल्या व कार्यरत असलेल्या जिप शिक्षक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांचे बदली / दौरा प्रवास भत्त्याचे देयके सुद्धा 5ते7 वर्षांपासून प्रलंबित आहेत.
पं स कामठी मधील शिक्षिका श्रीमती नलिनी आसोले ह्या 2017 साली जिप सेवेतून निवृत्त झाल्यात पण त्यांचा सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हफ्ता अजूनही त्यांच्या बँक खात्यात जमा झाला नसून त्यांनी केलेल्या तक्रारींवर पं स कामठी कडून काहीच प्रतिसाद मिळत नाही.
अनेक शिक्षकांच्या सेवापुस्तकात गट विमा योजनेच्या वेळोवेळी नोंदीच घेण्यात येत नसल्यामुळे अनेकांना गट विम्याची रक्कम सुद्धा मिळत नसल्याच्या तक्रारी सुद्धा आहेत.
बऱ्याच पंचायत समित्यांमध्ये सेवापुस्तकातील नोंदी अद्यावत करण्यात येत नसल्यामुळे जिप मुख्य लेखा व वित्त विभागात त्रुट्या काढत असल्याने पेन्शन प्रकरणे सुद्धा लवकर पूर्ण केले जात नाही.
सदर समस्या महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना जिल्हा शाखे तर्फे अनेकदा जिप प्रशासनाकडे मांडण्यात येऊन सुद्धा दिलासा मिळत नाही.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने सदर आर्थिक समस्या दूर करून सर्व शिक्षकांचे सेवापुस्तक ऑनलाइन करून प्रलंबित प्रवास भत्ता देयके, सेवा-उपदान रक्कम, अंशराशीकरण मूल्य रक्कम, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक, भविष्य निर्वाह निधी अग्रीम इत्यादी विहित मुदतीत मिळण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे सर्वश्री महेश जोशी, शरद भांडारकर, संजय चामट, मनोज घोडके, नितीन किटे, नंदकिशोर उजवणे, अशोक डहाके, दिपचंद पेनकांडे, चंद्रकांत मासुरकर, अरविंद आसरे, प्रवीण मेश्राम, मोरेश्वर तडसे, तुकाराम ठोंबरे, हरिश्चंद्र दहाघाणे, श्रीराम वाघे, रुपचंद फोपसे, सुनील नासरे, संजय केने, अलका पालवे, भावना काळाने इत्यादींनी केली आहे.