Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च ०७, २०२१

मानवतावादाचा पुरस्कार करणारी संत कवयिञींची मांदियाळी #womenDay

महिलादिन विशेष


' संतसाहित्य ' हे काळाच्या कसोटीवर टीकून राहिलेले साहित्य आहे.बंडखोरी,विद्रोह, अस्सल भाव आणि जीवनाचे मर्म संतांनी साहित्यातून उलगडले. म्हणूनच तर,"म. फुल्यांनी अभंगाचा रचनांध आपल्या 'अखंडा'त वापरला आणि तुकोबाला महासाधू म्हटले.डॉ आंबेडकरांनी आपल्या 'बहिष्कृत भारत ','महानायक' या मुखपञात संतवचनांना शीर्षस्थानी घेतले,हे समजून घेतले तर सामाजिक स्तरावरील संतसाहित्याचे मोल आपणास स्पष्टपणे अधोरेखित करता येईल."अनेक आक्रमणे महाराष्ट्रावर झाली ती संतांनी, समाजसुधारकांनी पेलली. महाराष्ट्र आणि मराठी माणूस वाचविला,हा इतिहास आहे.मग तो देवगिरीचा यादव असो की बेदरचा बादशहा.यांना शह देण्याचे महत्तकार्य संत करत आले.पोटपाण्याचा आपला व्यवसाय त्यांनी कर्ममय विठ्ठल केला.गोरोबा काका,सावता माळी,नरहरी सोनार, चोखामेळा,परिसा भागवत, विसोबा खेचर,सेना न्हावी व पुढे जाऊन एकनाथ,रामदास, तुकाराम,गाडगेबाबा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशी थोर परंपरा आपल्याला लाभली.ही संतकृपा समाजबांधणीसाठी होती.यांनी 'जगाचा संसार ' सुखाचा करुन तिन्ही लोकांत आनंद भरण्याचे काम केले. हे संतविचार आज देव्हा-यातून व्यवहारात आणणे लाखमोलाचे आहे.लोकपरिवर्तनाची ही चळवळ आज बिघडलेल्या समाजाला घडविण्याचे काम करणार आहे.परिवर्तन ही काळाची गरज असल्यामुळे या संथ समाजाला संतविचारच तारु शकणार आहेत.अंधश्रध्दा आज समाजात वाढलेली दिसते. त्यावरचे उत्तर संतसाहित्यात आहे.जातीव्यवस्था निर्मुलन अजूनही झाले नाही.याची उपाययोजना संतविचारात मिळते.संत क्रांतीदर्शी होते.ते केवळ 'टाळकुटे' नव्हते तर समाजात पुरोगामी विचार फुंकणारे होते,यादृष्टीने त्यांच्या विचाराची मौलिकता अपार मोलाची आहे.
*संत कवयित्रींची लक्षवेधी मांदियाळी*:
संतसाहित्याची मिमांसा करीत असतांना असे दिसते की, संतसाहित्य मांदियाळीत फक्त पुरुष संतच होते,असे आपल्याला म्हणता येत नाही.यात विलक्षण रचना करणा-या अनेक जातीधर्मातल्या स्ञियाही होत्या. पुरुषांच्या बरोबरीने त्याही चंद्रभागेतीरी अवतरल्या दिसतात.
यात ज्ञानोबाची बहिण मुक्ताई आहे,चोखियाची महारी सोयराबाई आहे,नामदेवाची दासी जनाबाई आहे,नाथपूर्वकालिन कान्होपाञा आहे,तुकोबाची शिष्या बहेणाबाई आहे.या सा-या महिलांनी आपल्यापरिने खारीचा वाटा उचलल्याचे दिसते. 'स्ञि-पुरुष समानता 'हे सूञ संतसाहित्यात बघायला मिळते आपले लौकिक जीवन सांभाळून पारलौकिक होण्याच्या वाटेकर या महिला कुठेही कमी पडल्या नाही.जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा तेव्हा त्यांनी आवाज उठविला आहे.विठ्ठलालाही शिव्यांची लाखोली जनाई, सोयराई वाहतेच ना?मुक्ताई कुटअभंग रचते." मुंगी उडाली आकाशी /तीने गिळले सूर्याशी /थोर नवलाव झाला /वांझे पूञ प्रसवला //" लहानग्या मुक्ताईचा हा असा मुक्त अविष्कार वाखाण्याजोगा आहे.
  सोयराबाई विठ्ठलाजवळ आपले ग-हाणे मांडते, "जन्म घेता उष्टे खाता /लाज न ये तुजले चित्ता //" आपल्या हिणजातीविषयी तिच्या मनात चिंता आहे,म्हणून ती चक्क लोकदेव विठ्ठलालाच बोलते. बहेणाई तर ज्ञानदेवाने रचलेल्या एकंदरीत भागवत संप्रदायाची महती थोडयाथोडक्या शब्दांत 'संतकृपा झाली /इमारत फळा आली 'या अभंगातून स्पष्ट करते. कान्होपाञा ही शामा गणीकेची कन्या.सुंदर,सोज्वळ या कन्येला तीची आई आपल्याच व्यवसायात आणू पाहते परंतु या प्रकारावर ती कडाडून हल्ला चढविते.वारक-यांच्या वारीत जाऊन ती विठ्ठलाला आपली आपबिती सांगून 'नको देवराया अंत पाहू आता /प्राण हा सर्वथा फुटो पाहे //' या अभंगातून आपल्या मनाची आर्तता सिध्द करतो.' विषयत्याग करुन नामभक्ती करा 'हा सल्ला कान्होपाञेने दिलेला आहे. 'पतित तू पावना पावना /म्हणविशी नारायणा रे! ' ही रचना म्हणजे तिचा मनाचा अत्युच्च विलास आहे, म्हणूनच तिच्या अभंगरचनेला ' हद् याचे आरसे 'म्हंटले गेले आहे. 
  शेवटी कान्होपाञेने विठ्ठलाच्या पायावर आपले डोके ठेवून प्राण त्यागला. तिला जिथे पुरण्यात आले तिथे एक वृक्ष उगवला.वारकरी त्याला कान्होपाञेचा झाड म्हणतात पण त्याचे खरे नाव 'तरटी वृक्ष ' असे आहे. ही कान्होपाञा बंडखोर कवयिञी असून तिने आपला आवाज विठ्ठलापर्यंत पोहचविला आहे.स्ञीमन विदीग्न झाले तर ते काय करते? याचा आलेख कान्होपाञेने आखून दिला आहे. 
      या सा-या संतकवयिञीत जिला 'संतवाटीकेतील जाईची वेल 'म्हणून गौरविल्या गेले ती म्हणजे जनाबाई."स्वतःला 'नामयाची जनी 'म्हणविण्यातच जीवनाचे सार्थक मानणा-या जनाबाईचे सुमारे साडेतीनशे अभंग उपलब्ध आहेत. स्ञीमनाचा हळूवारपणा आणि भक्तीची उत्कटता तिच्या सर्व अभंगामध्ये ओथंबलेली दिसते. परमेश्वरप्राप्तीची तळमळ आणि आर्तता यातून तिच्या ब-याचशा अभंगाचे लेखन झालेले आहे. त्यामुळे तिचे हे अभंग म्हणजे उत्कट भावगीतांची मालिकाच वाटते. " जनाई नामदेवाच्या कुटुबांत वाढली त्यामुळे नामदेवाची आई गोणाई, बायको राजाई, बहिण आऊबाई, लेक लिंबाई, सूना लाडाई, गोडाई व येसाईशी तिचा संबंध आला. नामदेवाच्या विठ्ठलभक्त कुटुंब सहवासात राहून जनाईलाही काव्य स्फुरले. आपल्या मनातील भावभावनांना तिने शब्दरुप दिले. तिचा एकेक अभंग म्हणजे भक्तीरसाने भरली तुडूंब नदी वाटते. संतवाटीकेतील स्ञीया अशा व्यक्त होत गेल्या. संपूर्ण या कवयिञिनी विठ्ठलाविषयी असीम भक्ती व्यक्त करुन समाजमन सजग करण्याचे व आपल्या भावविश्वातून, उपदेशपर अभंगातून जनसामान्याना उत्तम धडे देण्याचे पुण्यकर्म केले आहे. 
       या सर्व संतमंडळीचा समान भक्तीमार्गाचा धागा होता.अखिल मानवजातीच्या अभ्युदयासाठी या लोकचळवळीने रणशिंग फुंकले. देव दगडात नाही माणसात आहे, हे ओरडून सांगीतले. समाजाला नैतिकतेची शिकवण दिली. कर्मठपणावर वार केले. अंधश्रध्दांच्या  मूळाशी जाऊन लोकांना खरे विवेकज्ञान दिले,म्हणून आजच्या समाजात प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगायचे असेल तर या संतविचाराची कास धरणे गरजेचे आहे. आज धार्मिक क्षेञाचे बदलते स्वरूप लक्षात घेता भावभक्ती कमी आणि अवडंबरच जास्त माजविले जाते.पूर्वी जे प्रयत्न झाले नाही ते प्रयत्न संतांनी समाज अन् माणूस घडविण्यासाठी केले,त्यासाठी संत चंदनासारखे झिजले. घरावर तुळशीपञ ठेवून 'जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती ' जन्माला आल्या आजच्या विज्ञान अन् तंञज्ञान युगात संतविचाराची ही शिदोरी आपल्या तारणार आहे. पोथीनिष्ठ विचारांना आज पेव फुटले आहे.गावोगावी भागवत प्रवचनाच्या नावावर अनेक बाबा, महाराज लुबाडत आहेत. मंञतंञ दीक्षा देणे चालूच आहे.देवाला कोंबड, बोकड कापून नवस देण्याची प्रथा बंद झालेली नाही. देवदासीसारख्या प्रवृत्तीवर पूरता अंकुश नाही. बुध्दीप्राणाम्यवाद आपण झुगारुन दिला आहे.विवेकाचा दीवा विझलेला आहे.अशा विचिञ अवस्थेत समाज सापडला असल्यामुळे समाजाच्या आमुलाग्र जागृतीसाठी, मानवाच्या उत्थानासाठी, समाजाच्या शुध्दीकरणासाठी संतसाहित्य, संतविचारमूल्ये आपल्या मनात, जनात रुजणे अत्यंत गरजेचे आहे. या आजच्या विषन्न विचिञाचे उत्तर संतांच्या विवेकवादी विचारसरणीत नक्कीच आहे.त्यामुळे धर्मजीवनातील 'साचलेपणा ' निघून जाण्यास मदत होऊन 'शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी ' मिळायला वेळ लागणार नाही.

  - प्रा.डॉ.धनराज ल.खानोरकर 
        मराठी विभागप्रमुख
ने.हि.महाविद्यालय,ब्रह्मपुरी.जि- चंद्रपूर 
भ्रमणध्वनी :९४०३३०४५४३

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.