महिलांनी स्वतःमधील न्यूनगंड बाजूला ठेवावा- सरपंच प्रतिमा बोरकर
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.10.
घरातील चूल आणि मुलाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून, सामाजिक जीवनात महिलांनी सहभागी व्हावे. थोर पुरुषांच्या संघर्षमय त्यागातुन महिलांनी स्वतःमधील कसब दाखविण्याची संधी चालून आली आहे. या संधीचे सोने करावे, नकारात्मक विचारांना तिलांजली देऊन सकारात्मक विचार अंगी बाळगुण यशोशिखर गाठावे. महिलांनी स्वतःमधील न्यूनगंड बाजूला ठेवावा. असे आवाहन बोंडगावदेवी ग्रामपंचायत सरपंच प्रतिमा बोरकर यांनी महिलांना केले आहे.
ग्रामपंचायत बोंडगावदेवीच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ग्रामपंचायत सभागृहात आयोजित जागतिक महिला दिना प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून चान्ना बाकटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वेता कुलकर्णी डोंगरवार ,पोलीस पाटील मंगला रामटेके, उषा पुस्तोडे, माया मेश्राम, निराशा मेश्राम ,भामीना नेटिनकर, किरण खोबरागडे, रिता मानकर ,वर्षा राखडे ,दीपिका गजभिये, सुनंदा कोटरंगे ,डॉ. नेवारे, ऍड. श्रीकांत बनपूरकर ,अमरचंद ठवरे ग्राम विकास अधिकारी पी. एम. समरीत अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून उपस्थितांनी अभिवादन केले. यावेळी कर्तव्यनिष्ठ महिलांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नीराशा मेश्राम यांनी आपल्या कवितेतून महिला शक्तीचा गुणगौरव केला. अतिथींनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन उषा पुस्तोडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार माया मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी राष्ट्रपाल ठवरे, भोजराज मेश्राम, विश्वास लोणारे यांनी सहकार्य केले.