आपल्या मुलांवर स्त्री पुरुष समानतेचे संस्कार करा .-ठाणेदार जनार्दन हेगडकर
संविधान व सत्यम ग्राम संघाचा महिला दिन उत्साहात साजरा
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि. 10 मार्च:-
महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात महिलांनी ठाम
उभे राहायला पाहिजे, निंदानालस्ती पासून दूर राहून महिलांनी स्वतःचा सन्मान राखावा. मुलामुलीत भेदभाव न करता स्त्री-पुरुष समानतेचे संस्कार त्यांच्यावर करा.. समाजातील वाईट व्यसनांना महिलाच आळा घालू शकतात. असे प्रतिपादन नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी केले आहे.
येथील संविधान व सत्यम ग्राम संघाच्या वतीने दिनांक आठ मार्च रोज सोमवारला आंतरराष्ट्रीय महिला दिन येथील ग्रामपंचायत परिसरात दुपारी 1.30 वाजता उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. युगा कापगते यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. लता लांजेवार ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर, ग्रामपंचायत सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, खुशाल, काशिवार, वाघाये,डॉ. शुभांगी बोरकर, मनीषा तरोणे ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई सांगोळकर, सविता बडोले, सपना उजवणे ,आशा पांडे, कांता डोंगरवार,सत्यम ग्रामसंघाचे अध्यक्ष सुनिता डोंगरवार, सचिव वैशाली डोंगरवार, संविधान ग्राम संघाच्या सचिव शालू गोंधळे प्रामुख्याने उपस्थित होते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अतिथींच्या हस्ते अभिवादन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. उषा शहारे, माला बडोले, अरुणा शहारे यांनी गायलेल्या स्वागत गीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले. उपस्थित अतिथींनी महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. हिराबाई साखरे, लता जिभकाटे सुनंदा टेंभुर्णे यांनी महिलांचे कर्तृत्व कथन करणारे गीत गायले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान ग्राम संघाचे अध्यक्ष भिमाबाई शहारे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्यामकला औरासे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शितल राऊत यांनी मानले.
कार्यक्रमाला दोन्ही संघाच्या अंतर्गत असलेल्या महिला बचत गटांचे पदाधिकारी,सदस्य,आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका ,सदस्य व गावकरी महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनिता मलगाम, प्रीती खंडाईत, आचल सहारे, स्मिता हटवार तसेच संविधान व सत्यम ग्राम संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले.