मुद्रांक शुल्क भरल्यावर दस्त नोंदणीचा कालावधी चार महिने
दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 22 मार्च : स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत सुट जाहिर केली असल्याने या संधीचा लाभ घेण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 16 दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. तथापि मुद्राक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आंत नोंदणी साठी सादर करता येतात, त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
महसुल व वन विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई यांचे दि. 29 ऑगस्ट,2020 रोजीचे शासन राजपत्रानुसार, कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्ताऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 च्या खंड (बी) अन्वये अन्यथा आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क 1 सप्टेंबर 2020 पासून सुरु होणाऱ्या आणि दिनांक 31 डिसेबर 2020 रोजी संपणाऱ्या कालावधीकरीता दोन टक्के तर दिनांक 1 जानेवारी 2021 पासून सुरु होणाऱ्या 31 मार्च 2021 रोजी संपणाऱ्या दिड टक्केने कमी केले आहे.
तसेच, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन ,मुंबई यांचे दि. 31 ऑगस्ट,2020 रोजीचे शासन निर्णयान्वये ,महाराष्ट्र नगरपरिषद ,नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 147 (अ) अन्वये महानगरपालिका क्षेत्रात स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कावरील अधिभार दि. 1 सप्टेंबर 2020 ते 31 डिसेबर 2020 या कालावधीतकरिता अर्धा टक्के इतका कमी करण्यात आले आहे. तसेच 28 ऑगस्ट, 2020 रोजीचे शासन निर्णयान्वये, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, 1961 अन्वये स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणारा एक टक्का अधिभार हा दि. 1 सप्टेंबर 2020 ते 31 डिसेबर 2020 या कालावधीतकरिता शुन्य टक्के तर दि. 1 जानेवारी 2020, ते 31 मार्च 2020 अर्धा टक्के करण्यात आले आहे.
शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत दि. 31 मार्च 2021 अखेर पर्यंत असल्याने, या संधीचा लाभ घेण्याकरीता जि. चंद्रपूर येथिल एकूण 16 दुय्यम निबंधक कार्यालयात उक्त सवलत संपत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे.
माहे मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा उपरोक्त प्रमाणे लाभ घेण्याच्या दृष्टीकोनातून निष्पादित केलेच्या मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 23अनुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आंत नोंदणी साठी सादर करता येते.
सबब, कोव्हिड -19च्या प्रादुर्भाव लक्षात घेता मार्च 2021 शेवटी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी न करता, उपरोक्त प्रमाणे नोंदणी कायद्यातील तरतुदीचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी अ. प्र. हांडा व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.