रिच-४ चे कार्य जलदगतीने प्रगतीपथावर
*नागपूर १८ मार्च :* नागपूर मेट्रोच्या रिच-१ वर्धा रोड आणि रिच-३ हिंगणा रोड या दोन्ही मार्गिकांवर प्रवासी सेवा सुरु असताना, उर्वरित दोन - सेंट्रल एव्हेन्यू आणि कामठी रोड वरील प्रवासी सेवा सुरु होण्याची नागपूरकर उत्सुकतेने वाट बघत आहेत. या दोन्ही मार्गिकेवरील कार्य जलदगतीने सुरु असून आता मार्गिकेवरील झालेली कामाची प्रगती दृष्टीपथात येते आहे. मेट्रो स्थानकाच्या इमारती साकार होत आहेत. त्यामुळे या मार्गांवरील परिसराचे दृश्यच बदललेले जाणवते आहे. रिच-४ म्हणजेच सेंट्रल एव्हेन्यू या मार्गिकेवर स्थानकाच्या इमारती मेट्रो वायाडक्टला जोडून उभ्या राहिल्या आहेत. याच मार्गिकेवरील आंबेडकर चौक मेट्रो स्थानकाची इमारत आकार घेत असून या वास्तूचे ८० % बांधकाम पूर्ण झाले आहे.
सेंट्रल एव्हेन्यू रोडच्या मध्यभागी असलेल्या आंबेडकर चौक मेट्रो स्टेशनमध्ये त्याच्या ऐन मोक्याच्या स्थळामुळे रायडरशिप वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे. आजूबाजूची व्यापारी संकुले, निवासस्थाने, बँका आणि इतर व्यावसायिक दुकानांसारख्या कार्यालयीन परिसरामुळे या क्षेत्रासाठी मेट्रोचा प्रवास अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे. या परिसरातून प्रवासी दोन्ही दिशेने दुरून प्रवास करतात. हे मेट्रो स्थानक पूर्ण झाल्यावर या मार्गावरील प्रवाश्यांकरता हे अतिशय उपयुक्त स्टेशन ठरेल. एक्वा मार्गिकेवर हे स्टेशन असून पूर्वेला प्रजापती नगर तर पश्चिमेला लोकमान्य नगर या मार्गिकेवरील अंतिम स्टेशन असेल. सध्या सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवासी सेवा सुरु असल्याचे सर्व विदित आहे.
आंबेडकर चौक मेट्रो स्थानकाची उभारणी १७८७.०० वर्ग मीटर क्षेत्रात मीटर क्षेत्रात करण्यात आली असून लांबी ८१.२५ मीटर आणि रुंदी २२ मीटर एवढी आहे. संपूर्ण कामांपैकी या स्थानकाचे ८०% कार्य आतापर्यंत पूर्ण झाले असून उर्वरित कार्य जलदगतीने प्रगतीपथावर आहे. कॉन्कोर्स स्तरावर - फ्लोअरिंग लिफ्ट शाफ्ट, एससीआर, टॉम, एस्केलेटर हि कार्यालये असून संबंधित कामे प्रगतीपथावर आहे. स्टेशनवर २ लिफ्ट, २ एस्केलेटर असून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांकरता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि बायो-डायजेस्टर ची तरतूद देखील या स्टेशनवर करण्यात आली आहे.
या मार्गिकेवरील वायाडक्टचे म्हणजे मेट्रो पुलाचे कार्य जवळ जवळ पूर्ण झाले असून रूळ बसविण्याचे कार्य अंतिम टप्प्यात आहे.