नागपूर, 27 मार्च
सचिन वाझे प्रकरणामुळे जेवढी बदनामी महाराष्ट्राची झाली, तेवढी कोणत्याही प्रकरणाने झालेली नाही. पोलिस दलातील बदल्या, त्यासाठी पैसे घेणे, हप्ते वसुलीचे टार्गेट देणे यातून एक सिंडीकेट राज वाझेंच्या भरवशावर चालविण्यात आले. त्यामुळेच सचिन वाझेंचे सारे मालक आज चिंतेत आहेत, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नागपूर येथे आगमन झाले असता विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. एनआयएच्या चौकशीत आता वाझे काय-काय बोलणार, यामुळे त्याचे सारेच मालक अस्वस्थ आहेत. पण, काळजी करण्याचे कारण नाही. एनआयएच्या चौकशीत सारे काही स्पष्ट होणार आहे. बदल्यांच्या रॅकेटसंदर्भातील अहवाल आपण फोडला, असा आरोप नवाब मलिक यांच्याकडून गेला गेला, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात उत्तरात फडणवीस म्हणाले की, पोलिस बदल्यांच्या रॅकेटचा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे गेल्याने सारेच घाबरले आहेत. आपले कोणते बिंग फुटणार, याची त्यांना चिंता लागून आहे. असे असले तरी मी केवळ कव्हरिंग लेटर दिले होते. खरे तर नवाब मलिक यांनीच हा अहवाल फोडला आहे.
मुंबई पोलिस आयुक्तालयातील डीव्हीआरबाबत माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, आपल्या सरकारच्या काळात मुंबईत सीसीटीव्ही यंत्रणा लागली आहे. डीव्हीआर कुणीही गायब केला तरी त्याचे संपूर्ण बॅकअप मेन सर्व्हरमध्ये सुद्धा जमा होत असते. त्यामुळे तो गायब होऊच शकत नाही. त्याचे मिरर इमेजिंग सुद्धा होते. त्याचे डिजिटल फुटप्रिंट 3 ठिकाणी जमा होते. कोणताही एक माणूस ते नष्ट करू शकत नाही. एनआयएच्या चौकशीत सार्या बाबी हळूहळू पुढे येतील. नेमकी हीच भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. वाझेचे खरे मालक महाविकास आघाडीतच आहेत. त्यांच्याकडून ज्यांनी कामे करवून घेतली, ती आता बाहेर येतील का, हीच चिंता त्यांना सतावते आहे. वाझे काय-काय बोलणार, यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत.
कोरोनाच्या स्थितीचा विचार करा!
देशातील कोरोनाची स्थिती आणि महाराष्ट्राची स्थिती यातील अंतर इतके का आहे, याचा विचार महाराष्ट्र सरकारला करावा लागेल. जितक्या लस केंद्राने दिल्या, त्या अजूनही वापरलेल्या नाहीत. त्यामुळे उगाच केंद्रावर टीका करण्याऐवजी प्रत्यक्ष कोरोना नियंत्रणाचे उपाय राबविले पाहिजे. नागपुरातील स्थिती दिवसांगणिक भयावह होते आहे. 4500 केसेस दररोज आढळत आहेत. स्थिती गंभीर आहे. प्रशासनाने पूर्णपणे अॅक्टिव्ह मोडमध्ये जाऊन लोकांना दिलासा द्यावा आणि प्रत्यक्ष मदतही करावी, असे ते म्हणाले.