Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०३, २०२१

गोंड राजे बख्त बुलंद शहा यांची समाधी उपेक्षित



1702 साली नागपूरची स्थापना करणारे गोंड राजे बख्त बुलंद शहा यांची समाधी अत्यंत वाईट अवस्थेत आहे.

बख्त बुलंद शाह 1702 साली देवगडवरून नागपुरात आले व येथे त्यांनी आपली राजधानी स्थापन केली. त्यानंतर 1706 साली बख्त बुलंद शाह यांचे नागपुरातच निधन झाले व सक्करदरा परिसरातील याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज ही समाधी अश्रू ढाळत आहे.

आज शहरात अनेक ठिकाणी वाडे आणि हवेल्या दिसत असल्या तरी या शहरातील पहिली भव्य वास्तू म्हणजे गोंड राजे बख्त बुलंद शाह यांचा महालातील किल्ला. १७०२ मध्ये गोंड राजे बख्त बुलंद शाह यांनी नागपूरला राजधानीचा दर्जा दिला असला, तरी हा किल्ला मात्र त्यापूर्वी बांधण्यात आला होता. देवगड राज्याचे एक प्रमुख ठाणे नागपूर होते.




१६३७ साली खानदौराने नागपूर किल्ल्यावर आक्रमण करण्याचे ठरविले व आपल्या सैन्यासह त्याने बुटीबोरीला तळ ठोकला. त्यावेळी देवाजी हा या किल्ल्याचा ठाणेदार होता. त्याला खानदौराने शांतीचा संदेश पाठवून किल्ला आपल्या ताब्यात देण्यास सांगितले. देवाजीने नकार दिल्याने खानदौराचे सैन्य गोंड राजांच्या सैन्याने किल्ल्याला वेढा दिला. किल्ल्याच्या उत्तरकेडील बुरूज त्यांनी बारुद लावून पाडला व खानदौराचे सैन्य आत घुसले. या सैन्याने गौंड सैन्याची कत्तल केली. याबाबत कळताच गोंड राजे कोकशहा देवगडवरून नागपूरला आले व त्यांनी खानदौराची भेट घेतली. खानाला त्यांनी १ लाख रुपये किमतीची भेट, ५० हजार रुपये रोख, १ हजार हत्ती दिले व दर तीन वर्षांनी मोगलांच्या खजिन्यात ४ लाख रुपये जमा करण्याचे वचन दिले. त्यामुळे खानाने हा किल्ला गोंड राजांना परत दिला.

असा हा ऐतिहासिक किल्ला जाटबाने बांधला होता. सोळाव्या शतकात देवगडमध्ये तुळोजीचे राज्य होते. नागपूर, भानारा (भंडारा) हे त्याच्या राज्याचे प्रदेश होते. पराक्रमी गोंडवीर जाटबाला तुळोजींनी नागपूरला ठणेदार म्हणून पाठिवले व त्यांनीच जाटबाला नागपूरला किल्ला बांधण्यास सांगितले होते. आज महालातील कल्याणेश्वर मंदिराच्या पुढील मार्गावर असलेल्या या किल्ल्याला त्यावेळी ४५ फूट उंचीचे चार भक्कम बुरूज होते. किल्ल्याभोवती परकोट व त्या भोवती २४ फूट रूंद खंदक होता. या किल्ल्याचा आता एक बुरुज शिल्लक आहे. त्यावर त्यावेळच्या खानदौरासोबत झालेल्या युद्धात वापरली गेलेली मरियम तोफ आजही अस्तित्वात आहे. ही तोफ पंचधातूंची अआहे. बख्त बुलंद शाह यांचे पुत्र चाँद सुल्तान यांनी किल्ल्याभोवतीच्या परकोटाला आठ दरवाजे बांधले होते. आज गांधी गेट किंवा शुक्रवार दरवाजा म्हणून परिचित प्रवेशद्वार हे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार होते. भंडार दरवाजा, दसरा दरवाजा, छोटी खिडकी, तुळसीबाग, भुत्या दरवाजा, गाडीखाना, शुक्रवार दरवाजा, बुधवार दरवाजा व इतवार दरवाजा अशी आठ प्रवेशद्वारे या किल्ल्याला होती


आतील महालापुढे आलीशान दरबार होता. दरबाराच्या पुढे संगमरवरी फवारा होता. आता दरबार नसला तरी फवारा अजूनही आहे. पूर्व दक्षिण भागात असलेल्या बगिचातील झाडांना पाणी देण्यासाठी छोटे कालवे होते. दक्षिणेकडे पायऱ्या असलेली विहीर आहे. याच भागात पूर्वी टांकसाळ होती. तेथे तांब्याची नाणी तयार व्हायची. महालाच्या मागील भागात चाँद सुलतानचे पुत्र मीर बहादूरचा मकबरा आहे. मीर बहादूरचे लग्न ठरले होते. त्यामुळे त्याला हळद लागली होती. तशा स्थितीत बख्त बुलंद शाहंचा दासीपुत्र वलीशाहने त्याची हत्या केली. किल्ल्यावर याच ठिकाणी मीर बहादूरची समाधी आहे. ती जागा हल्दीवाले बाबा का मकबरा म्हणून ओळखली जाते.

सध्या या किल्ल्यात बख्त बुलंद शाह यांचे वंशज राजमाता राजश्री देवी, त्यांचे पुत्र राजे वीरेन शाह व राजे चंद्रशील यांच्यासह राहतात. या महालातील दिवाणखान्यात जाताना दोन्ही बाजूला सिंहाच्या प्रतिकृती आहेत.

सक्करदरा पोलिस स्टेशनच्या बाजूला संगम टॉकीजकडे जाणार्‍या रस्त्यावर आझमशहा लेआउटमध्ये आहे. त्याच्या बाजूलाच चाँद सुल्तान यांचीही समाधी आहे. ’कब्रस्थान बाग’ नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण म्हणजे गोंड राजे परिवारातील सदस्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव जागा होती. याठिकाणी जवळपास 28 कबरी आहेत. यातील 25 कबरी एका ओळीत उंच ओट्यावर बांधल्या आहेत, तर बख्त बुलंद व चाँद सुल्तान यांची समाधी दुसर्‍या बाजूला आहे. कबर बांधकामासाठी नक्षीदार दगडाचा वापर करण्यात आला आहे. काही समाधींचे नक्षीदार दगड लोकांनी काढून नेले आहेत. पूर्वी राजघराण्यातील व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या अंगावरील दागिने मृतदेहासह पुरण्यात येत असत. त्या दागिन्यांचा शोध घेण्यासाठी मध्यंतरी काहींनी काही ठिकाणी कबरीच्या बाजूला खोदून ठेवले होते. काही कबरींवर त्या कोणाच्या आहेत, याचा उल्लेख आहे. एका कबरीवर राजे बख्त बुराण शाह यांचा उल्लेख आहे. 1796 साली त्यांचा मृत्यू झाल्याचे इंग्रजी व उदूर्मध्ये कोरण्यात आले आहे. दुसर्‍या कबरीवर राजे रहमान शाह यांचे नाव आहे पण मृत्यूचे साल देण्यात आलेले नाही. नाव असलेली तिसरी कबर शेवटचे राजे बख्त बुलंद शाह यांची आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.