राजेंद्र बढिये यांचे अर्थमंत्री अजित पवार यांना साकडे
नागपूर - राज्याचा सादर होणा-या अर्थसंकल्पात भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त आघाडीचे विदर्भ अध्यक्ष राजेंद्र बढिये यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
राज्याचा सन २०२१ - २०२२ चा आगामी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार नागपूर विभागीय दौऱ्यावर आले आहे. आज (ता ८) रामगिरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त आघाडीचे विदर्भ अध्यक्ष राजेंद्र बढिये यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
यात अर्थसंकल्पात भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करावी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व रखडलेल्या शिष्यवृत्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, भटक्या विमुक्त व ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी तयार केलेल्या महाज्योती संस्थेला सारथीच्या धर्तीवर वाढिव ५०० कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे, क्रिमीलेअरच्या अटितून भटक्या विमुक्तांना वगळण्यात यावे या मागण्यांचा समावेश होता. उपरोक्त मागण्यांवर सकारात्मक विचार करुन अर्थसंकल्पात भटक्या विमुक्त प्रवर्गाला न्याय देण्यात येईल, असे आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त आघाडीचे विदर्भ अध्यक्ष राजेंद्र बढिये यांच्यासह संघर्ष वाहिनीचे संघटक मुकुंद अडेवार, बेलदार समाज संघर्ष समितीचे सचिव खिमेश बढिये, ओतारी समाज संघटनेचे किशोर सायगन, वैभव बढिये, धनंजय गोमासे यांच्यासह भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.