सौ.संगीताताई वाईकर.....
संगीताताईंचे अलिकडे तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. पहिला " दुर्वार्पण" दुसरा " योगेश्वर" , तिसरा "नक्षत्रांच्या सहवासात " दौर्वार्पण हा लघुकथासंग्रह 2015 मध्ये प्रकाशित झाला.या कथा संग्रहात 21 कथांचा समावेश आहे. अनुभवातून निर्माण झालेल्या तसेच आजूबाजूला घडणार्या घटना मधून निर्माण झालेल्या कथांचा हा कथासंग्रह आहे.
दुसरा कथासंग्रह " योगेश्वर " .ह्यात 25 निवडक लेखांचा समावेश केला आहे.ह्यात काही धार्मिक तर काही वैचारिक माहितीपर लेख आहेत.
तिसरा कथा संग्रह हा "नक्षत्रांच्या सहवासात " . यात लेखिकेने 27 नक्षत्रांची ओळख वाचकांना करून दिली आहे.
लेखनासाठी घरातून सहकार्य ही महत्वाची व आनंदाची बाब असते. ताईंच्या लेखन कार्यात आई-वडीलांचे संस्कार व आजी-आजोबांच्या सहवासात वाचनाची गोडी व त्यांचे उत्तम मार्गदर्शन व प्रोत्साहनाने त्यांना लिहिते करण्यास प्रेरणा मिळाली. त्यांनी वृत्तपत्रातून अनेक अभिप्राय, प्रतिक्रिया व विविध विषयांवर ललीत लेखन केले.कथामधे सामावलेल्या विविध सत्य घटना हे त्यांच्या लेखनाचे आधार असले तरी त्या प्रासंगिकतेतून मानवी मनाचे दर्शन घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.समाजात घडणार्या वेगवेगळ्या प्रसंगातून हे कथाविषय लेखिकेला सापडत गेले.आणि त्याचे कथेत रेपांतर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काही कथा वर्तमानपत्रात, काही दिवाळी अंकात समाविष्ठ झाल्या.ती एक उत्तम कथा लेखिका आहे.कथेला सामाजिक पार्श्वभूमी अनायासे लाभलेली दिसते. ह्या संग्रहात अनेक रंगी कथा आहेत .आयुष्याचे विविध पैलू मानवी जीवनात नित्य घडणार्या विविध प्रसंगातून लेखिकेने उलगडले आहेत
अशा ह्या प्रसंगवर्णनापर कथा आहेत. अगदी साध्या, सरळ पध्दतीने लेखिकेने वेगवेगळे पैलू समोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. समाजात वावरतांना आजूबाजूला जे वास्तव दिसले त्यांना शब्दरूप दिले. त्या काळजाला भिडलेल्या काही अनुभवांना कथेच्या रूपाने आपल्या समोर मांडण्याचा लेखिकेने प्रयत्न केला आहे.भाषेची जाण आणि कथालेखनाची प्रतिभा हे दोन्ही गुण त्यांच्या कथेत प्रामुख्याने आढळतात.
प्रस्तुत " दुर्वार्पण" कथासंग्रहात एकूण 21 कथा आहेत. प्रत्येक कथा वैशिट्यपूर्ण आहे. वाचनीयच नव्हे तर लक्षणीयही आहे.प्रत्येक कथेमागे लेखिकेची स्वःताची अशी स्पंदने आहेत. ती उत्स्फूर्त आहेत. जिवंत आहेत. प्रत्येक कथा ताजी टवटवीत वाटते.लेखिकेचा हा पहिला कथासंग्रह असूनही कुठेही त्यात नवशिकेपणा आढळत नाही, हे उल्लेखनीय आहे.
"नक्षत्रांच्या सहवासात "लेखिकेने 27 नक्षत्रांची ओळख वाचकांना करून दिली आहे. ह्या नक्षत्रांची निवड करतांना त्यांनी कुठलेही प्रादेशिक बंध स्वतःवर घालून घेतले नाही. यात पंजाब प्रांतातील अमृता प्रीतम यांचा समावेश आहे. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे दक्षिणेतील तर डाॅ.विश्वेश्वरैया हे कर्नाटकातले आहेत.त्यातही विदर्भ, पूणे, मुंबई, नाशिक, कोकण ह्या सगळ्या विभागातील आहेत. यात समर्थ रामदास स्वामी, संत नामदेव या अध्यात्मिक क्षेत्रात वावरणार्या आहेत.तर संगीत क्षेत्रातील अक्षयतारा असणार्या लतादीदींचा समावेश केलेला आढळतो. आचार्य राम शेवाळकर , बॅ. वि.दा. सावरकर, साने गुरूजी, विद्या बाळ असे विविध विचार प्रवाहांचे नक्षत्रही या नक्षत्रमालेत भेटतात.संगीताताईंचे प्रेरणा स्थान असणार्या शुभांगीताई भडभडे यांचाहि या नक्षत्रात समावेश आहे.
"योगेश्वर " या कथा संग्रहात 25 लेख आहेत. योगेश्वर म्हटलं की भगवतगीतेतून 18 अध्याय सांगणारा योगेश्वर श्रीकृष्ण आठवतो. विविधतेचं दर्शन देणारा तो योगेश्वर, आत्मा आणि परमात्मा यातला दुवा असतो तो लेखक, विविध अंगानी लिहित असतो.सामाजिक घटनातून येणार्या अनुभूती आणि संवेदना जेंव्हा अनावर होतात तेंव्हा लेखकाची अभिव्यक्त होण्यासाठी शब्द व्याकुळ असतात. साहित्य हे अनुभवातून , चिंतनातून साधकाकडंन प्राप्त झालेला अविष्कार असतो.
संगीताताई वाईकर यांचा अध्यात्म हा आवडता विषय आहे. देवतांवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे.ह्या योगेश्वर लेख संग्रहाची सुरवात त्यांनी श्री गणेशाच्या लेखापासून करून श्री गणेशाचेही दर्शन त्यांनी लेखातून घडविले आहे. देवावर विश्वास आणि धर्मावर विश्वास ठेवणार्या व्यक्तिंना ह्या लेखातून संजीवन मिळतं यात संदेह नाही.त्रिगुणात्मक त्रैमुर्ती यातून आलेलं दत्तात्रयांच वर्णन मनाला भावतं.शास्त्राचा अभ्यास करून लेखिकेने हे लेख लिहिले आहेत. एकूणच लेखिकेचा कल हा संदर्भ लिहण्याकडे असल्याने हे लेख वाचकांना नवा संदर्भ देत राहतात.
हे तिनही कथासंग्रह अप्रतिम आहेत.वाचकांना नक्की भावणार यात शंका नाही.संगीताताई साहित्याच्या नभागणात नुकताच प्रवेश केलेली एक तारका आहे. पूढील साहित्य लेखनाला त्यांना आमच्या अनेक शुभेच्छा.
..
शंकर जाधव, 7875015199