राजूरा तालुक्यात एका आठवडयात दोन ठिकाणी सुरूवात
चंद्रपूर,ता. 3 : ग्रामीण भागात विक्री व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाकडून जिल्हयात "रुरल हाट" नावाचा नाविण्यपुर्ण उपक्रम राबविला जात असून, राजूरा तालुक्यातील विहीरगाव व हरदोना खुर्द येथे रुरल हाट सुरू करण्यात आले. अगदी पहिल्याच दिवशी ग्राहकांनी विविध वस्तूंची खरेदी करुन स्वयंसहायता समुहांचा उत्साह वाढविला.
बचतगटातील महिला विविध वस्तूंचे उत्पादन करतात. मात्र, त्यांना स्थानिक बाजारपेठ मिळत नाही. ही अडचण लक्षात घेवून उमेद अभियानातील बचतगटांच्या महिलांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीची रितसर परवानगी मिळवून गावातच दैनिक किंवा आठवडी छोटेखानी बाजार सुरू करण्याच्या संकल्पनेने अनेकांना सुविधाजनक झाले आहे. विशेषकरुन स्थानिक भाजीपाला उत्पादकांना याचा फायदा होणार आहे.
दिनांक 02 फेब्रुवारी रोजी चुनाळ विरुर प्रभागातील विहिरगाव येथील मॉ जिजाऊ महिला ग्रामसंघाद्वारे रुरल हाटचे आयोजन करून विधिवत उदघाटन करण्यात आले. या उदघाटन सोहळ्यास राजूरा पंचायत समितीचे सभापती मुमताज जावेद, उपसभापती मंगेश गुरनुले साहेब, पंचायत समिती सदस्य माणुसमारे, माजी सभापती जेनेकर, सचिव सूर्यवंशी, जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भांडारकर, तालुका अभियान व्यवस्थापक डोंगरे, तालुका व्यवस्थापक पडवे, श्री. भडके, प्रभाग -समन्व्यक अमित भगत , ग्रामसंघ पदाधिकारी व समूहातील सदस्य उपस्थित होते. उदघाटन सभापती यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रुरल हाटमध्ये प्रथम दिवशी 10 समूहातील सदस्यांनी आपल्या वस्तू विक्री साठी ठेवल्यात.
दिनांक 29 जानेवारी रोजी आर्वी -पाचगाव प्रभागातील हरदोना खुर्द येथील सुरक्षा महिला ग्रामसंघद्वारे रुरल हाटचे आयोजन करून उदघाटन करण्यात आले. या उदघाटन सोहळ्यास मान्यवरांसह सरपंच सूर, सचिव मेश्राम, प्रभाग समन्वयक साईकिरण धोटे सर्व ग्रामसंघ पदाधिकारी व समूहातील सदस्य उपस्थित होते. सदर बाजार हाट चे उदघाटन उपसभापती गुरनुले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर बाजार हाट मध्ये प्रथम दिवशी 12 समूहातील सदस्यांनी आपल्या वस्तू विक्री साठी ठेवल्यात.
या संकल्पनेचा इतर तालुक्यांनीही अनुसरण करावे व उत्पादने विक्री करावी, असे आवाहन मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डीले, अभियान सहसंचालक किरवे, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने यांनी केले आहे