Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १८, २०२१

कोण कारणीभूत?




दररोज वर्तमानपत्र टीव्ही उघडताच,आपण बलात्कार,अत्याचार, विनयभंगाच्या बातम्या सर्रास घडतांना वाचतो, ऐकतो. तेवढ्यापुरतं वाईट वाटतं,आपण हळहळतो,रागात एखादी कमेंटही पास करतो,या दुष्टांना कशी सजा व्हायला पाहिजे, न्यायव्यवस्था कशी कमकुवत आहे किंवा आजकालच्या आधुनिक परिस्थीतीला बोटे दाखवून मोकळे होतो आणि पुढल्या थोड्यावेळातच सारे विसरून आपापल्या कामाला लागतो.प्रकरण पाच दहा दिवस सारखं चिघळतं, उगाळलं जातं.रवंथ करुन मग हळूच गिळलं जातं.पुढील तपास सुरू असल्याच्या खमंग बातम्या रंगवून सांगितल्या जातात.लोक मोर्चे काढतात. कँडल मार्च ही काढला जातो.काय होतं या सगळ्याचं नंतर? सगळं हळूहळू थंडावतं,बातम्या हवेत विरतात.रागरोषावर बर्फ पडतो.सगळं जिथलं तिथं होतं आणि शेवटी खरा आरोपी बेछूट बाहेर फिरत असतो..राजरोसपणे... सगळ्यातून मोकळा...नवे गुन्हे करायला आणि समोरच्याला उदाहरण देखील देऊन जातात, कारण काहीही,कितीही अपराध केले तरी शिक्षा होतच नाही. हे चांगलच माहित झालेलं असतं.जामिन मिळतो.केस चालते... कासवगतीपेक्षाही मंद नी आजन्म. मग भिती कसली.मनमानी करायची मुभाच मिळते.एकाचं बघून दुसरा,तिसरा....काही वाकडं नाही होतं आपलं आणि झालच तर असतात आतआतले छुपे, गुप्त असे फंडे.तोंडात बोकणाभर नोटा कोंबल्या की तोडं कायमचे बंद.अंगवळणी पडलय आता हे.डोकं सुन्न होतं.दात ओठ खावूनही गप्पच बसावं लागतं.मजबूरी का नाम संयम है ।हेच खरे.

कसे थांबवता येतील हे सगळे भोंगळे कारभार? असेलच की एखादा मार्ग.कुठल्याही समस्येला उपाय तर असतोच.अशक्य असं या जगात फक्त मेलेल्याला जिवंत करणच होय,बाकी हाताचा मळ.

सर्वांत आधी संपूर्ण स्त्री वर्गाने खंबीर होणे आवश्यक आहे.शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या.घराघरातून मुलामुलींवर सुसंस्कार घडविणे गरजेचे आहे.ते करायला आधी स्वतः शिक्षित असणे जरुरी आहे.मानवी मुल्ये, तत्वांबद्दल माहिती असणे,ते आत्मसात करणे व आचरणात आणण्यास आपण स्वतः
आग्रही असले पाहिजे.हे क्षणभंगुर असे मानवी जीवन सुकारणी लावण्याची तळमळ हवी.माणूसकीची कास हवी.विचारांची प्रगल्भता, परिपक्वता जोपासली गेली पाहिजे.ती जगली गेली पाहिजे.सुसंस्कार, सुविद्या,सुसंगत,सदाचरण ही त्याची विविधांगे होत.

विशेषतः महिलांनी आपल्या मर्यांदांची परिसीमा ओलांडून चालणार नाही. महिला या केवळ उपभोगिय वस्तू नाही हे ठणकावून सांगितले पाहिजे. आपल्या अफाट शक्तिचे सामर्थ्य पुरुषवर्गांला मान्य करायला भाग पाडण्याची धमक प्रत्येक स्त्री मधे आहेच, मात्र ती कृतीतूनही दाखवून दिली पाहिजे.स्वतःमध्ये आत्मविश्वास जागृत असला पाहिजे. नव्हे की अंगप्रदर्शन करुनच तुम्ही हे साध्य करु शकता.काहीही गरज नाही.कुठल्याही स्त्रीचे सौंदर्य हे संपूर्ण नेटक्या कपड्यात झाकलेली असतांना आणखी खुलून उठतं.हेच पुरुष वर्गालाही मान्य आहे.कुठल्याही अंगप्रदर्शन करणाऱ्या स्त्रियांपेक्षा पारंपरिक वेशभूषेत जी स्त्री वावरते, तिचा आदर नक्कीच शतपटीने पुरुषवर्गांच्या आणि संपूर्ण समाजाच्या दृष्टीने वृद्धिंगत होतो.काही महिला चित्रपटातून जाहिरातींमधून सर्रास ,खुलेआम अंगप्रदर्शन करतात.पोटापाण्यासाठी,प्रसिद्धीसाठी की सुंदरतेचे प्रदर्शनाकरिता ? यामागची कारणमीमांसा प्रत्येक स्त्रीपरत्वे निरनिराळी असू शकते. खरोखर मनापासून करतात का त्या हे सगळे ? कुठलीही स्त्री ही मनापासून आपल्या देहाचे धिंडवडे उडवणार नाही.स्वखुशीने तर मुळीच नाही. ग्लँमरच्या दुनियेत म्हणे अश्या सेस्की पोज द्याव्याच लागतात.सीनची डिमांड वैगरे नेहमीच बोललं जातं.म्हणतात अंगप्रदर्शन करावच लागतं.अशाने विक्री वाढते,नफा मिळतो.खरोखर हास्यास्पद आहे हे.कुणी ठरवलं हे सगळं?कँमेरासमोर अर्धनग्न असे विक्षिप्त व्हिडीओ, फोटो काढले जातात.लोकाच्या लाईकस् करता,व्हीवज मिळवण्यासाठी. कुठल्या नीच पातळीवर उतरतात.कोण जबाबदार आहे याला.कुठल्या मायबापाला,वाडवडिलांना हे पटत रुचत असणार? हव्यास असतो,माज चढतो आणि त्यामुळे बुद्धी जंगते,निर्बुद्ध होते.मनात भिती असते मात्र त्यावर निर्लज्जपणाचे, लालसेचे कवच चढलेले असते.खुपच आवश्यक आहे का हे? का ?कशासाठी?

मात्र यांच्या अशा वागण्याने समाजावर अत्यंत भयानक दुरगामी दुष्परिणाम होत आहेत.समाज ढासळतोय.नवी पिढी लयाला जातेय.तरुणाई या विभत्सतेच्या अंधानुकरणाला जगण्याची शोभा मानतेय.बघितलं तसच आपणही करुन बघू ची होड लागलीय.पॉर्न साईटच्या सुकाळामुळे सज्ञान होण्या अगोदरच, किशोरवयात मुलामुलींना सगळच बघायला मिळतय नी कळायला लागलय.त्याचे परिणाम म्हणून बलात्कारांचे व्यभिचारांचे प्रकार हल्ली बोकाळले आहेत.त्याचे परिणाम म्हणून ही वासनेची आग विझविण्यासाठी अगदी कोवळ्या वयाच्या मुलींनाही शिकार बनवलं जातं.मग ती आपलीच नातलग असो की विद्यार्थीनी,शेजारी असोत की अनोळखी. यासाठी मुलांना फ्रीडम हवय.बंधने नकोत.घरच्यांचे ऐकायला नको.आईवडिलांची गरज फक्त पैसा पुरविण्या इतकीच.

पुर्वीच्याकाळी मुलांपेक्षा मुलींना जास्त धाकात ठेवले जायचे.नियम,बंधन,सीमा होत्या.ते काटेकोरपणे पाळले व ऐकले ही जायचे.चुल मुल एवढच विश्व असणारी स्त्री मग शिकायला बाहेर पडली.स्त्री शिक्षणाची लाट आली.महिला स्वतंत्र झाल्या.नोकरी करु लागल्या.अगदी सर्वच क्षेत्रांमध्ये त्या बाजी मारु लागल्या.पुरुषांच्या बरोबरीने सक्षम झाल्या.आतातर महिलावर्ग पुरुषांपेक्षाही वरचढ आहेत.आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महिला उच्चपदावर कार्यरत आहेत.परंतु..... हा परंतु काही पिछ्छा सोडत नाही...कारण त्यांच्या सुरक्षिततेची हमी आजही आपण देऊ शकत नाही.तिथेही त्यांना घाणेरडी वागणूक दिली जाते.कमी लेखले जाते.स्त्री ही केवळ उपभोगिय वस्तू म्हणून बघितले जाते.का ?

हा कोत्या,कुलषित आणि कुपोषित मानसिकतेचा परिणाम होय.स्त्रियांच्या राहणीमानावरुन,कपड्यांवरून अनेक वादळे उठतात.त्यांनी काय नेसले पाहिजे,कसे राहिले पाहिजे ह्यावर बंधने तर आहेतच.मात्र त्यांच्या पेहरावावरून पुरुषांची मानसिकता का बदलावी? पर स्त्रीकडे ते आदराने बघू शकतच नाहीत का? भारतीय संस्कृती ही खुप श्रीमंत आहे आणि तिचा आदर प्रत्येक भारतीयांना असायलाच हवा.कुठल्याश्या प्रलोभनांना बळी पडायला नकोय.

शरीराला कमाईचे साधन बनविणाऱ्या महिलांनी देहाची लक्तरे वेशीवर टांगण्या आधी हा एकच उपाय आहे का याचा एकदा तरी विचार करायला हवा.आपल्यावर काय शोभतं, कितपत खुलतं एकदा मागून पुढून बघून मगच निर्णय घेतला पाहिजे. उगाच स्वतःला हसूचे साधन बनवून घेणे मुर्खपणाचे ठरेल.खरेतर स्त्री ही ममतेचे,मृदुलतेचे,शक्तीचे प्रतिक आहे.लाज ही स्त्रीचा दागिना आहे.आपण देहास झाकूनही सुंदर दिसूच शकतो,नाही का? हे ठासून सांगण्याची धमक स्वतःत आणायला हवी.यात संपूर्ण स्त्रीवर्गाचा स्वाभिमान दडलाय.अनेक उदाहरणे आहेत आपल्या आजुबाजुला.अनेक क्षेत्रांमधील यशस्वी स्त्रियांचा आदर्श बाळगायला हवा.अंबा दुर्गा काली चंडिका भवानीच्या रुपात तुम्ही वासनांधांच्या नजरांना नमवू शकता.लक्ष्मी सरस्वतीच्या रुपाने जगाचा उद्धार करण्याची ताकद तुमच्यात आहे.हे विसरून चालणार नाही. पण त्यासाठी हे अंगप्रदर्शन थांबवावे. ही कळकळीची विनंती. भारतीय संस्कृती जिंदाबाद!👍

अनुराधा हवालदार
नागपूर.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.