जुन्नर मधील पहिल्या शिवविवाह निमित्त छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ,बळीराजा यांच्या प्रतिमांचे पूजन करताना वधू वर
जुन्नर/वार्ताहर
जुन्नर चे माजी उपनगराध्यक्ष व मराठा सेवा संघाचे मा.अध्यक्ष ऍड.राजेंद्र बुट्टे पाटील यांचे चिरंजीव प्रतीक आणि धामनखेल येथील विविध कार्य.सोसायटीचे अध्यक्ष बाळकृष्ण वर्पे यांची कन्या रोशना यांचा विवाह रविवार दि ५ जानेवारी रोजी जुन्नरमधील रुक्मिणी मंगल कार्यालय येथे पार पडला..
पारंपरिक विवाहपद्धतीला फाटा देत छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ,बळीराजा यांच्या प्रतिमाचे पूजन तसेच संत तुकाराम ग्रंथ व शिवधर्म ग्रंथ या ग्रंथांचे पूजन करून विवाह सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. शिवपुजनानंतर पारंपरिक मंगलाष्टकांऐवजी जिजाऊ वंदना, शिवपंचके म्हटली गेली.शिवमती सुवर्णा बनबरे यांनी जिजाऊ वंदना आणि शिवपंचके गायली.त्यानंतर वधू वर यांनी शिवशपथ घेतली. या विवाहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वराला वधूच्या वामांगी (डाव्या बाजूस) बसवण्यात येऊन मातृसत्ताक पद्धतीचा आदर व्यक्त करण्यात आला. वधूवरांच्या मातापित्यांना विचारमंचावर मान्यवरांच्या ऐवजी स्थान देण्यात आले होते तसेच त्यांना शिवग्रंथ आणि संत तुकाराम ग्रंथ देण्यात आले.मराठा सेवा संघाचे प्रवक्ते शिवश्री गंगाधर बनबरे यांनी वेरूळ येथील शिवपार्वती शिल्पावरून शिवविवाह संदर्भात उपस्थितांना प्रबोधन केले.तसेच शिवविवाहाचे महत्व विषद केले.
वधु आणि वर दोघेही उच्चशिक्षित असून वधु रोषणा ही इंजिनिअर असून मिलेनिअम एरोडायनानिक लिमिटेड कम्पनी मध्ये सिनिअर सेल्स मॅनेजर आहे. तर वर प्रतीक हा बी.टेक कृषी अभियांत्रिकी/ऍग्री इंजिनिअर असून ऍग्रोझोन स्पेक्ट्रम इंटरनॅशनल येथे सेल्स हेड म्हणून कार्यरत आहे. लग्नपत्रिका, मानपान, सत्कारावरील खर्च टाळत सिंदखेडराजा येथील मातृतीर्थ जिजाऊ जन्मस्थान यासाठी बुट्टे पाटील कुटूबीयांकडून शिवश्री गंगाधर बनबरे यांच्या कडे रक्कम शिवदान करण्यात आली. युवा नेते अमित बेनके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड.संजय काळे,विघ्नहरचे उपाध्यक्ष अशोक घोलप,शास्त्रज्ञ डॉ.रामदास डामसे,सुभाष कवडे,वकील मंडळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.बुट्टे पाटील कुटुंबियांचे जुन्नरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव योगदान आहे.जुन्नर परिसरात या शिवविवाहाची चर्चा होत असून नागरिकांकडून याबाबत कौतुक व्यक्त केले जात आहे.