ग्रामीण भागातील ‘घरकुल मार्ट’ दिशादर्शक ठरेल
– राहुल कर्डिले
Ø विभागातील पहिले ग्रामीण घरकुल मार्ट ग्रामपंचायत आष्टा येथे
Ø घरकुलासाठीचे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध होणार
चंद्रपूर, दि. 10 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायत आष्टा येथील घरकुल मार्ट हे नागपूर विभागातील पहिले घरकुल मार्ट चंद्रपूरसह संपूर्ण नागपूर विभागाला दिशादर्शक ठरेल, अशी आशा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केली असून अशा प्रकारची घरकुल मार्ट संकल्पना संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उमेद अभियानाअंतर्गत नाविन्यपुर्ण उपक्रम म्हणून ग्रामपंचायत आष्टा ता. भद्रावती येथे महिलाशक्ती ग्रामसंघ ग्रामीण घरकुल मार्टचे उद्घाटन नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले .
घरकुल मार्ट अंतर्गत घरकुल लाभार्थीना घर बांधण्यासाठी सिमेंट, लोहा, वीटा, दरवाजे, खिळे, तार, शौचालय सिट, खिडकी ई. सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. घरकुल मार्ट सुरु होण्यापूर्वी लाभार्थीना घरकुल करिता लागणारे सर्व साहित्य चंदनखेडा, शेगाव, वरोरा येथील सूमारे 10-15 km अंतरावरुन आणावे लागत होते. मात्र या घरकुल मार्ट मुळे लाभार्थीचा वाहतुकीचा खर्च वाचणार असून वेळेची देखील बचत होणार आहे.
या घरकुल मार्ट चा थेट फायदा आष्टा ग्रा.प. च्या परिघातील मानोरा, कारेगाव, किन्हाळा, वडाळा, कोकेवाडा, सोनेगाव, काटवल, घोसरी, पळसगाव, रानतळोधी अशा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या सूमारे आठ ते दहा गावांना होणार आहे. तसेच ग्रा.प. आष्टा येथील जवळपास 100 ते 110 घरकुल लाभार्थीना सर्व साहित्य माफक दरामध्ये चांगल्या गुणवत्तेचे उपलब्ध होणार असल्यामूळे थेट फायदा होणार आहे.
सर्वांसाठी घरे-2022 हे केंद्र शासनाचे महत्वाकांक्षी धोरण असुन राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्विकार केला आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, कोलाम आवास योजना इ. घरकुल योजना राबविण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी गतिमान व गुणवत्तापुर्ण राबविण्याकरिता राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दि. 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या 100 दिवसांच्या कालावधीत “महाआवास अभियान-ग्रामीण" राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याअंतर्गत घरकुल मार्ट हा नाविन्यपुर्ण उपक्रम मूख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आल्याचे भद्रावतीचे गट विकास अधिकारी मंगेश आरेवार यांनी सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, शाम मडावी, ग्रामसेवक भारत राठोड, राकेश तुरारे, मिलिंद नागदेवते व सर्व महिला शक्ती ग्रामसंघाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते .