मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश
*नागपूर, ता. १७ :* शहरातील सर्व झोन अंतर्गत येणारे रस्ते व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याबाबत कारवाईला सोमवारपासून गती द्या, असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उपायुक्त महेश मोरोने व सर्व सहायक आयुक्तांना दिले.
शहरात फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमण संदर्भात मनपाने अतिक्रमणधारकांविरुद्ध कठोर पाऊले उचलली आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आपल्या आदेशात शहरातील सर्व भागांमध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी एकाच वेळी मोहीम चालविण्यास सांगितले आहे. मनपा आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश देत सांगितले की, सर्व भागांमध्ये प्रभावी कारवाई नियमित होताना दिसली पाहिजे. यासाठी कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक, सिव्हील इंजिनिअरिंग असिस्टंटसह 8 मजूर मिळून प्रत्येक वॉर्डात पथकाचे गठन करून मोहीम राबविण्यात येईल.
*कामचुकारपणा केल्यास कठोर कारवाई*
अभियानादरम्यान अतिक्रमणाबाबत ढिसाळ धोरण अवलंबविणाऱ्या अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि जर एखादी तक्रार किंवा गडबड आढळल्यास विभागीय चौकशी करून प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशाराही मनपा आयुक्तांनी दिला आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानंतर उपायुक्त महेश मोरोने यांनी सर्व झोनशी संबंधित अधिकाऱ्यांना ही मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या सोबतच त्यांनी अतिक्रमणधारकांना फुटपाथ आणि रस्त्यांवर ताबा न करण्याचे आवाहन केले आहे.
शहरात सोमवारपासून फुटपाथ आणि रस्त्यांना अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मोठी मोहीम सुरू करण्यात येईल. या दरम्यान आता प्रत्येक भागात अतिक्रमणधारकांचे सामान जप्त केले जाईल आणि कोणत्याही स्थितीत परत मिळणार नाही. मोहिमेदरम्यान जप्त करण्यात आलेल्या सामानाचा लिलाव मासिक तत्वावर केला जाईल, असेही मनपा आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.