पद्मगंधाचा जीवन गौरव मा.नितीनजी गडकरी यांना
नागपूर : पद्मगंधा प्रतिष्ठान ही विदर्भातील लोक प्रतिष्ठीत साहित्य संस्था.या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा नलिनी बाळकृष्ण देवपूजारी पुरस्कृत " जीवन गौरव पुरस्कार" यंदा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.श्री नितीनजी गडकरी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. मा. कांचन ताई गडकरी यांचा ही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
आज पर्यंत प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रांत उच्चतम कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.त्यात पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर,डॉ.रघुनाथ माशेलकर,पद्मश्री ॲड उज्ज्वल निकम, वक्ता दशसहस्त्रेशू डॉ. राम शेवाळकर, मॅगसेसे पुरस्कार प्राप्त मा. बाबा आमटे,ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते मा.दिलीप प्रभावळकर अशा विविध नामवंतांना गेली अठरा वर्षे हा पुरस्कार देण्यात येत आहे. यंदाचे हे एकोणविसावे वर्ष आहे.
या वेळी विशेष अतिथी मा.श्री बनवारीलालजी पुरोहित,महामहीम राज्यपाल तामिळनाडू यांची उपस्थिती असणार आहे तर उद् घाटक विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र मा.श्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. अध्यक्षस्थानी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.पंकज चांदे आणि सुप्रसिध्द बालरोगतज्ञ डॉ.सतीश देवपूजारी यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. सद्य परिस्थिती नुसार नियमांचे काटेकोरपणे पालन करून अत्यल्प उपस्थितीत हा सोहळा १७ जाने २०२१ रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता श्री शक्तिपीठ, रामनगर, नागपूर येथे संपन्न होणार आहे.