ग्रापं निवडणुकीचा आज प्रचार थांबणार
शेवटच्या दिवशी पदयात्रा, रॅलीवर भर
चंद्रपूर : येत्या 15 जानेवारीला जिल्ह्यातील 130 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचा प्रचार उद्या 13 जानेवारीला थांबणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी रिंगणात असलेले उमेदवार पदयात्रा, रॅली काढून शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे दिसून येते. कोरोना संसर्गामुळे ब्रेक मिळालेल्या ग्रामपंचायतींना मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, गेल्या महिन्यात राज्य निवडणूक आयोगाने संबंधित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा राजकीय घडामोडींमुळे रान तापले. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गावोगावी प्रचाराचा धुरळा उडत आहे. रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी केवळ 8 दिवसच मिळाले. या निवडणुकीत सरपंचपदाचे आरक्षण निश्चित नसल्याने बहुतांश गावातील दोन विरोधी गटांनी एकत्रित येत बिनविरोध निवडी करण्याचा प्रयत्न अखेरच्या दिवसापर्यंत सुरूच ठेवला होता. यात बहुतांंश गावांना यश आलेच नाही. सरपंचपदाचे आरक्षण निश्चित नसल्याने दोन ग्रामपंचायतींनी जरी अविरोध निवडी केल्या असल्या तरी सरंपचपदाचे आरक्षण व त्यानंतर कोणाची निवड करायची यावरुन पुन्हा एकदा वाद होण्याचीही अनेक गावांत शक्यता निर्माण झाली आहे. काही गावांनी सरळ दोन गटांत पॅनेल तयार करुन निवडणुकीस सामोरे जाणेच पसंत केले आहे.बहुरंगी लढतीची चुरस- राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक आघाड्या, पॅनेलमध्ये या निवडणुका होत आहेत. बर्याच ग्रामपंचायतींमध्ये बहुरंगी लढती होणार असून ही लढाई लक्षवेधक ठरणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव कारभार्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. घर टू घर मतदारांना भेटून साकडे घातले जावू लागले आहे. मतदानासाठी कमी वेळ शिल्लक असल्याने गाठीभेटींवर जोर दिला आहे. जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांची धडपड सुरु आहे. काही ठिकाणी आमदार मंडळींनीही लक्ष घालण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे