Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर ०६, २०२०

एप्रिल २०२३ पर्यंत इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेबांचे स्मारकाचे काम पूर्ण करू - धनंजय मुंडे



महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर केले अभिवादन

मुंबई (दि. ०६, डिसेंबर) : इंदूमिल येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल तसेच १४ एप्रिल २०२३ ला याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न करू असे विधान राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. दादर येथील चैत्यभूमीवर आयोजित महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन सभेत ना. मुंडे बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करून बाबासाहेबांना शासकीय मानवंदना देण्यात आली. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्तुपाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोशयारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांसह मान्यवर उपस्थित होते.

०६ डिसेंबर १९५६ रोजी ज्ञानाचा अथांग सागर, ज्ञानसूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यावेळी जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांचा प्राण तळमळला, एवढेच नव्हे तर दादरच्या त्या सागराचा देखील प्राण तळमळला असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांनी समाजाला दिलेली शिकवण याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू, आमच्या पुढील अनेक पिढ्यांना ही शिकवण प्रेरणा देत राहील; असेही यावेळी बोलताना ना. मुंडे म्हणाले.

राज्य शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यावतीने यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम विविध माध्यमातून बाबासाहेबांच्या कोट्यावधी अनुयायांसाठी लाईव्ह दाखवत दादर येथील चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. देशभरातील लाखो अनुयायांनी शिस्त पाळत याला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व अनुयायांचे आभार यावेळी धनंजय मुंडे यांनी मानले.


खा. शरद पवार यांच्यासोबतही अभिवादनास उपस्थित

दरम्यान शासकीय कार्यक्रमानंतर लगेचच दादर येथील चैत्यभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती स्थळी अभिवादन केले, यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे हे सोबत उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी यावेळी खा. पवार यांना कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.