शेअर बाजारात राष्ट्रीय पेक्षा जागतिक घडामोडीचा जास्त प्रभाव असतो. हे एकदा पुन्हा अमेरिकेतील निवडणूकीने स्पष्ट केले. कोविडचा वाढता धोका आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूकीचे बिगुल वाजताच काही प्रमाणात रसातळाला गेलेला शेअर बाजार आता निकालाचे चित्र स्पष्ट होताच सावरत आहे.
अमेरिका निवडणूकीचे निकाल जसे-जसे समोर येत आहेत, त्याचा परिणाम निफ्टी आणि सेन्सक्सच्या वाढीव आलेखावर अधोरेखित होत आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये झपाट्याने आगेकुच करणारा शेअर बाजार एप्रिलपासून चांगलाच आपटला. शेअर बाजार कोसळ्यामुळे करोडो गुंतवणूकदारांचे नुकसान होऊन धक्का बसला. पण, कोविडबद्दलची कमी होणारी भीती आणि अमेरिकेतील निवडणूक आटोपल्याचा परिणाम बाजारात दिवाळीत गुंतवणूकदारांच्या घरी 'हिरवे दिवे' लावत आहे. दिवाळीत येणाऱ्या निफ्टीने 12000 चा पल्ला आताच गाठला आहे. तर बँक निफ्टी पण 25000 हजारच्या पुढे सरकला आहे. ही बाब अर्थव्यवस्था आणि गुंतवणूकदारांना दिलासा देणारी आहे. दिवाळीनंतर काहीसा बाजार पुन्हा कोसळू शकतो. हा उतार-चढावचा खेळ सुरूच असेल. मात्र, आपली गुंतवणूक न थांबविता पुढे जाणे, यातच समृद्धी आहे. रोज बाजारातून कसे पैसे कमवायचे यावर लक्ष केंद्रीत करून कोणत्या कंपनीचा शेअर वाढू शकतो, याचा अभ्यास करावा लागेल.
एवढे कराच !
शेअर बाजारात पैसे कमविणे सोपे नाही. पण, काही बाबींवर लक्ष केंद्रीत केल्यास निश्चितच यश मिळते.
- - दररोज आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबत 'अपडेट'रहा.
- - कोणत्या कंपन्या किती काळ टिकाव धरू शकतात, याचा अभ्यास करा.
- - कंपनी शेअर चार्टचा अभ्यास न चुकता करा, तुम्हाला यशस्वी गुंतवणूकदार होण्यास मदत होईल.
- - कोणत्या घडामोडींमुळे कंपन्याच्या शेअरचे भाव कमी-जास्त होणार, ही कला अवगत करा.
- - कंपनीच्या कामगिरीचा आलेख पहा.
- - सध्या कशाची आवड लोकांमध्ये आहे आणि ती भविष्यातही कायम असेल, अशा कंपनीच्या उत्पादनावर विशेष लक्ष द्यावे.
- - आर्थिक घडामोडीचा संबंध शेअर बाजाराशी कसा लावायचा, हे अवगत करा.
- - गुंतवणूक तज्ज्ञ मंडळींच्या संपर्कात राहून मनाची होणारी घालमेल थांबवा.
- - अफवा किंवा फसविणाऱ्या कॉलपासून सावध रहा.
घसरणीत करा गुंतवणूक
अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदरात केलेली कपात व बाँड मार्केटला दिलेली लिक्विडिटी बाजाराला बळ देत आहेत. त्याप्रमाणे भारतीय रिझर्व बँकेने केलेली व्याजदरातील कपात बाजाराच्या तेजीला इंधन पुरवित आहेत. चीनसोबत सुरु असलेला सिमावाद, कोविडची भीती, कंपन्यांचे कमी झालेले नफ्याचे प्रमाण आणि राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय अचानक घडलेल्या घडामोडींच्या नकारात्मक बाबींचा परिणाम बाजारावर होत आहे. तरीही, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत बाजार 'लिक्विडिटी'च्या जोरावर पुढे जात आहे. दीर्घकालीन म्हणजे सात-दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी संयम सोडू नये. तिमाही निकालांकडे लक्ष ठेवून चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसल्यास हळू-हळू आणि थोडी-थोडी गुंतवणूक करावी. जेणेकरून त्या कंपनीत सकारात्मक घडामोडी घडल्यास शेअरचे भाव वाढतील आणि तुम्हाला लाभ होईल.
युवकांचा कल वाढतोय!
कोरोनामुळे व्यवसाय ,कंपन्या बंद असल्याने अनेकांचे 'वर्क फ्रॉम होम' सुरु आहे. अनेकांना बाजारातील घातक चढ-उताराचे आकर्षण असते. बाजारात नवखे असतील तर आणखीच आकर्षण वाढते. सी.डी.एस.एल.च्या आकडेवारीवरुन मार्च ते मे मध्ये 18 लाख नवीन डिमॅट खाते उघडण्यात आले आहेत. यावरून शेअर बाजारात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या युवकांना शेअर मार्केटमध्ये डोकावून अभ्यास करावा लागेल. अन्यथा पैसे बुडणाऱ्यांच्या यादीत आपलाही क्रमांक लागू शकतो, हे विसरून चालणार नाही.
काय व्हायचे? ट्रेडर की इन्व्हेस्टर, तुम्ही ठरवा
गुंतवणूक कोणतीही असू द्या, त्यात दुप्पट, तिप्पट, चौपट पैसे करण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. यशस्वी गुंतवणूकदार ट्रेडिंगकडे (कमी कालावधीसाठी गुंतवणूक करणे) लक्ष देत नाही. ट्रेडिंगमध्ये नुकसान झाल्यावर क्वचितच कोणीतरी यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकतो. श्रीमंतीची स्वप्ने पहात शेअर बाजारात ट्रेडिंग करून अल्पावधीत मोठा पैसा मिळेल, या आशेने ट्रेडिंगकडे वळतात. मात्र, ज्ञान नसल्याने अनेकांचे ट्रेडिंगमध्ये हात जळतात. चार्ट वाचण्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी नसणे, शेअर बाजाराची माहिती नसणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींची 'लिंक' शेअर बाजारासोबत न लावता येणे आणि अन्य बाबींचे मंथन करता येत नसलेलं शेअर बाजाराच्या नावे जुगार म्हणून बोटे मोडतात. ट्रेडिंग शॉर्ट टर्म ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे मुळातच भिन्न प्रकार आहेत. एखाद्या शेअर्समधील अल्पावधीतच चढ-उतार हा फंडामेंटल पेक्षा त्या शेअर्सची बाजारातील मागणी आणि पुरवठा यावर चालू असतो. दर सेकंदा गणिक बाजारात येणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बातम्या विदेशी व व संस्थात्मक ट्रेडर मोठ्या कमर्शियल ब्रोकिंग कंपन्या रोजच्या ट्रेडिंगसाठी आता 'अल् गो ट्रेड'चा वापर करू लागले आहेत .त्यामुळे त्यांचा स्टॉपलॉस हिट झाल्यास एका क्षणात लाखो शेअरची विक्री होऊन त्या शेअरचा भाव कल्पनेपलीकडे खाली येऊन ट्रेडरचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते .शेअर बाजाराच्या प्रत्येक मोठ्या तेजीत किंवा मंदीत स्वतःला गुंतवणूकदार अथवा ट्रेडर म्हणणारे नवीन मंडळी लाखोंच्या संख्येने शेअर बाजारात येत असतात. ट्रेडिंग अथवा शॉर्ट ट्रेडिंग करताना नफा झाल्यास किती होऊ शकतो आणि तोटा झाल्यास तो सहन करून कुठे बाहेर पडायचे किंवा किती काळ थांबायचे, हेच बऱ्याच जणांना माहिती नसते. यासाठी बाजारातील विविध पैलूंचा बारकाईने अभ्यास करून चांगला गुंतवणूकदार होता येईल.
रोज एखादा चांगल्या कंपनीचा भूतकाळ काय होता? आणि भविष्य कसे असेल? तेथील उत्पादनाला उतरती कळा लागेल की आगामी काळात पुन्हा भरारी घेऊ शकते काय? याचा अभ्यास करूनच कंपनी शेअर मध्ये गुंतवणूक करावी.
- मंगेश दाढे
(या लेखामधील मत हे वैयक्तिक आहेत.)