चार लाख ९० हजार रुपयाची फसवणुकीचा गुन्हा दाखल
लिपिक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
वाडी जवळील डिफेन्स अंबाझरी येथील डिफेन्स प्रोजेक्ट सेवकांच्या पतसंस्थेत चार लाख ९० हजारांच्या अनागोंदीच्या प्रकरणात खळबळ उडाली. पतसंस्थेच्या एका लिपिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन या प्रकरणात अधिक आरोपी सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .पतसंस्थेचे लिपिक आरोपी प्रतीक आठवले यांना सोमवार २६ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले आहे .न्यायालयाने आरोपी लिपीक यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सुत्राच्या प्राप्त माहितीनुसार
आयुध निर्माणी परिसरात डिफेन्स प्रोजेक्ट सेवकांची पतसंस्था आहे.या संस्थेत ४ लाख ९० हजार रुपयाची अनागोंदी केली आहे. १७ जणांच्या नावावर फर्जी कर्ज उचलून भ्रष्टाचार केला आहे.
संस्थेच्या १५ सदस्यांच्या नावावर फर्जी कर्ज उचलण्यात आले परंतु त्यांच्या नावावर कर्ज कोणी काढले हे त्यांना माहिती नाही.जेव्हा बँकेत पैसे भरण्याची नोटीस त्यांना मिळाली तेव्हा १५ लोकांना कर्जाबद्दल कळले.असे दोन लोक आहेत जे संस्थेचे सदस्य नसतानाही त्यांच्या नावाने फर्जी कर्ज काढले आहे. परंतु त्यांच्या नावावर कर्ज कसे देण्यात आले हा प्रश्न पतसंस्थेवर उपस्थित होत आहे. ही फसवणूक २०१७ मध्ये झाली होती.त्यासंदर्भात २०१९ मध्ये तक्रार करण्यात आली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत हा खटला चालू आहे.पोलिसांनी पतसंस्थेचे कबुलीजबाब, रजिस्टर रेकॉर्ड जप्त केले आहेत.
फिर्यादी लेखापाल समीर सुरेश चिमोटे वय ३९ वर्ष यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी आरोपी प्रतिक आठवले विरुद्ध कलम ४२०, ४१९ , ४०६, ४०८, ४६५, ४६७, ४६८,४७१, १२० बी अन्वये गुन्हा दाखल केला असुन . पुढील चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे करीत आहे .