राजुरा / प्रतिनिधी
बामनवाडा येथील आदिवासींचे आराध्य दैवत जंगोदेवी देवस्थानचे परिसरात विविध झाडे लावून झाडांची पूजा करण्यात आली.
आदिवासी बांधव हे निसर्ग पूजक असून आदिवासी झाडांची पूजा करतात याचे चित्र जंगोदेवी देवस्थानात पाहायला मिळाले.
जंगोदेवी देवस्थानचे परिसरात मोह, साग, बेल, जांभूळ, कडुनिंब, मोवई, सालई, ही झाडे लावून पूजा करण्यात आली. या झाडांना आदिवासी बांधव देव मानत असून या झाडांची पूजा करतात अशी माहिती आदिवासी बांधवांनी दिली.
आदिवासींच्या संस्कृतीचे जतन व संरक्षण होण्याच्या दृष्टीने जंगोदेवी देवस्थान जागेचा निस्तार हक्क शासनाने द्यावा अशी मागणी अनेक महिन्यांपासून बामनवाडा येथील आदिवासी महिला, पुरुष करीत आहेत. ही मागणी मान्य करून एक एकर जागेचा निस्तार हक्क द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आदिवासी न्याय हक्क परिषदेचे केंद्रीय संयोजक, बिरसा क्रांती दल चे प्रमुख संतोष कुळमेथे, श्रमिक एल्गार संघटनेचे उपाध्यक्ष, तथा आदिवासी न्याय हक्क परिषदेचे केंद्रीय संयोजक घनशाम मेश्राम यांनी केली आहे.
जंगोदेवी देवस्थान च्या परिसरात विविध झाडांची पूजा करण्यासाठी सकाळ चे पत्रकार मनोज आत्राम, अभिलाष परचाके, चित्रांगण कोवे, रमेश आडे, उध्दव कुळसंगे, नटवरलाल खंडाते, अरुण कुमारे, उपस्थित होते.