शाळांची फी भरावीच लागणार ;
फी टप्प्याटप्प्याने भरण्याचा पर्याय उपलब्ध
चंद्रपूर(खबरबात):
लॉकडाऊन कालावधीत शुल्कवाढ आणि फी वसुली न करण्याचे शासनाचे आदेश होते. मात्र आता अनलॉक सुरू झाले असून सर्व संस्था चालक, व्यवस्थापकांच्या शाळा ऑनलाइन सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक शुल्क तात्पुरते वसूल न करण्याचे आदेश होते शुल्क माफ करण्याचा कोणताही आदेश शासनाने दिला नसल्यामुळे शाळेची फी भरायची नाही, अशा संभ्रमात पालकांनी राहू नये. फी एकमुस्त न घेता टप्प्याटप्याने घेण्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे, असे अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थी आणि पालकांकडून शैक्षणिक वर्ष 2019-20 ची शिल्लक व वर्ष 2020-21 मधील देय होत असणारी शाळेची वार्षिक फी एकदाच न घेता मासिक, त्रैमासीक जमा करण्याचा पर्याय शाळेने पालकांना द्यावा असे शासन निर्णयात नमूद आहे. त्यामुळे पालकांनी टप्प्या टप्य्याने फी भरण्याचा अर्ज शाळेकडे केला तर शाळा तसे टप्पे पाडून शुल्क भरण्याची सवलत देईल.
शाळांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता कोणतेही फी वाढ करू नये. या वर्षात जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही व त्याबाबतचा खर्च कमी होणार असल्यास पालकांच्या कार्यकारी समिती मध्ये ठराव करून त्याप्रमाणे योग्य प्रमाणात शुल्क कमी करावे. लॉकडाऊन कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी पालकांना ऑनलाईन फी भरण्याचा पर्याय देण्यात यावा, असे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.परंतु लॉकडाऊन घोषित कालावधीत पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या शाळेची फी भरू नये या प्रकारचा कोणताही निर्णय शासनाने निर्गमित केलेला नाही.
कोरोना काळात ऑनलाइन वर्ग सुरू
22 जुलै 2020 या शासन निर्णयानुसार ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पूर्वप्राथमिक करिता दर दिवशी 30 मिनिटे, पहिली ते दुसरी 30 मिनिटांची दोन सत्रे, तिसरी ते आठवी दर दिवशी 45 मिनिटांच्या दोन सत्रे, आणि नववी ते बारावी दर दिवशी 45 मिनिटांची दोन सत्रे यानुसार ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच शाळा या शासनाच्या निर्णयानुसार कार्य करीत आहे.