: शेतकरी कामगार पक्षाची अदिती तटकरे यांच्याकडे मागणी
पनवेल (२९ सप्टेंबर): कोविड 19 चा प्रादुर्भाव तसेच मच्छिमारांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी करंजा संस्थेने सादर केलेल्या यादीतील १०० मासेमारी नौकांना तात्पुरत्या स्वरूपात / कालावधीत त्यांच्या करंजा बंदर येथे मासे विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, विधान परिषदेचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी उद्योग,खनिकर्म,पर्यटन, फलोत्पादन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार भाई बाळाराम पाटील यांनी अदिती तटकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रायगड जिल्हयातील करंजा संस्थेच्या यादीतील नमूद मासेमारी नौका मुंबई शहर जिल्हयात कार्यरत असून नविन भाऊचा धक्का व ससून डॉक बंदरातील वर्तमान परिस्थिती पाहता कोविड १९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संस्थेने प्रस्तावित केलेल्या १०० मासेमारी नौकांना करंजा जेट्टी व करंजा टर्मिनल ॲन्ड लॉजिस्टिक कंपनी जवळ ( कासवले घाटला ) मासे विक्री करण्यास परवानगी दिल्यास मुंबई शहर येथील नविन भाऊचा धक्का व ससून डॉक बंदरातील गर्दी टळणे, मच्छिमारांचे आर्थिक नुकसान टाळणे तसेच करंजा येथील स्थानिक बाजारपेठेत मासेविकीसाठी उपलब्ध झाल्याने बाजार पेठ विकसित होण्यास मदत होईल या अनुषंगाने करंजा बंदर येथे मासे विक्रीस परवानगी देण्यात आलेली होती, परंतू काहींच्या वैयक्तिक हितासाठी सदर परवानगीस स्थगिती दिल्याने मच्छिमारांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
तसेच करंजा गावी मासे विकी करण्यास परवानगी देण्याबाबतचे अभिप्राय मुंबई विभागाचे प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्तांनी महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय आयुक्त यांना पाठविलेला आहे. त्यामुळे कोविड १९ चा प्रादुर्भाव तसेच मच्छिमारांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी करंजा संस्थेने सादर केलेल्या यादीतील १०० मासेमारी नौकांना तात्पुरत्या स्वरूपात / कालावधीत त्यांच्या करंजा बंदर येथे मासेविकी करण्यास परवानगी देणेबाबत संबधितांना आपल्या स्तरावरून आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही आमदार भाई बाळाराम पाटील यांनी केली आहे.