चंद्रपूर(ख़बरबात):
पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यात महावितरणच्या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसात वैनगंगा तसेच प्राणहिता व इतर उपनद्यांना महापूर आल्यामुळे महावितरणच्या यंत्रांचे सुमारे २ कोटी ३१लाखाचे नुकसान झाले आहे. पुरामुळे सुमारे ५६९ गावे बाधित झाले असून सुमारे ८९ हजार २२६ ग्राहकांचा वीज पुरवठा बाधित झाला होता. ब्रम्हपुरी व किन्ही उपकेंद्र पूर्णपणे पाण्यात बुडाले असून या भागातील ग्राहकांना इतर उपकेंद्रांद्वारे वीज पुरवठा करण्यात येत आहे.
पुरामुळे बाधित ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्याकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे तसेच या साठी युद्धस्तरावर मोहीम राबविण्यात येत आहे. .ज्या भागात पुराचे पाणी अद्याप साचून आहे या भागात खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. पाणी कमी होताच या ठिकाणी महावितणकडून तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
महावितरण कडून पूर असलेल्या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मोहीम जोरात सुरू असून पुराचे पाणी ओसरल्यावर सर्वच भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल,असे महावितरणने कळविले आहे.