गडचिरोली. कोरोनाच्या संकट काळात मोडकळीस आलेल्या शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांपर्यंत भांडवली कर्ज देण्याची तरतूद आहे. या योजनेअंतर्गत शहरातील 3 लाभार्थ्यांना जिल्हा वर्धापन दिनानिमित्त कर्ज वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या संकटातून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शासनाने टाळेबंदी जाहीर केली होती. यात अनेकांचा व्यवसाय मोडकळीस आला. याचा सर्वात जास्त फटका अल्प भांडवलीवर व्यवसाय करणा-या पथविक्रेत्यांना बसला. बंदच्या काळात जवळ असलेली जमापुंजी उदरनिर्वाहात खर्ची घातली असल्याने व्यवसाय पुन्हा उभारणीसाठी पथविक्रेत्यांना व फेरीवाल्यांना मदतीचा हात देण्याकरीता केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत 24 मार्च 2020 पूर्वीपासून शहरामध्ये विक्री करणा-या पथविक्रेत्यांना 10 हजार रुपयांचे खेळते भांडवल कर्ज स्वरुपात बॅंकेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
.....
योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
गडचिरोली जिल्ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते मुख्याधिकारी संजीव ओहोळ, युनियन बॅंक शाखेचे शाखा व्यवस्थापक सदानंद चालीगांजेवार, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत शहरातील 3 लाभार्थी रेखा होमराज खरवडे, शारिक शेख, मधू किसन हजारे यांना धनादेश वितरित करण्यात आले. या योजनेचा जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा, वेळेवर नियमित कर्जाची परतफेड करावी, यासंदर्भात स्थानिक नगर परिषद, नगरपंचायतशी संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले.
,..
73 प्रकरणे मंजूर
गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषद व 9 नगरपंचायती मार्फत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना कार्यान्वित केली जात आहे. जिल्ह्यात आजवर 356 कर्जाची प्रकरणे ऑनलाईन भरण्यात आलेली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील विविध बॅंकांनी प्राप्त झालेल्यापैकी 73 प्रकरणे मंजूर केलेली असून 33 लाभार्थ्यांना कर्ज वितरित केले आहे.