..............................................
मृताच्या नातेवाईकांना दीड लाखाची सूट
.................................................
पनवेल/ प्रतिनिधी
एकीकडे कोरोनाची दहशत, दुसरीकडे काही खासगी डॉक्टरांचा नंगानाच अशा भयावह परिस्थितीत कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांना धडकी भरत असताना त्यांचे अश्रू पुसून आधार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू सातत्याने पुढे सरसावत आहेत. त्यांच्या एका फोनवरून डॉक्टरांनी दीड लाख रुपयांची सूट देवून माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले आहे.
मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी असलेले पनवेल तालुक्यातील आजिवली येथील बबन राठोड यांचा कोविडशी हॉस्पिटलमध्ये झुंजताना निधन झाले.
नवीन पनवेल येथील पँनासिया हॉस्पिटलमध्ये त्यांना कोरोना निष्पन्न झाल्यानंतर दाखल करण्यात आले होते. घरची बेताची परिस्थिती त्यात महागडे उपचार करताना त्यांनी जेमतेम पन्नास हजार रूपये जमा केले होते. उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि नातेवाईकांना उर्वरित बिलाची रक्कम भरण्यास सांगण्यात आले. मेडिकल स्टोअर्सही मागे लागले. माणूस तर सोडून गेला आणि जवळ पैसेही नाहीत. अशा परिस्थितीत त्यांचे नातेवाईक दुहेरी संकटात अडकले होते.
टायगर ग्रुपचे निलेश चव्हाण यांनी विजय राठोड यांना सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांचा संपर्क क्रमांक देवून त्यांना माहिती देण्यास सांगितले. त्यानुसार राठोड यांनी कडू यांच्याशी संपर्क साधला.
कडू यांनी तातडीने पँनासिया हॉस्पिटलचे रोखपाल विजय तांडेल यांना सांगून राठोड यांच्याकडे बिलाची रक्कम भरण्यास पैसे नसल्याने दीड लाख रुपयांची सूट देण्यात यावी अशी विनंती केली.
हॉस्पिटल आणि औषधांचे मिळून अडीच लाख रुपयांचे बिल झाले होते. त्यापैंकी पन्नास हजाराची अनामत रक्कम दिली होती. जवळपास दोन लाख रूपये हॉस्पिटलला देणे बाकी होते. परंतु हाती काहीच नव्हते.
कडू यांच्या विनंतीला मान देवून डॉ. सुभाष सिंग यांच्याशी सल्लामसलत करून विजय तांडेल यांनी चक्क दीड लाख रुपयांची सवलत दिली. राठोड यांच्या नातेवाईकांना संकटात झालेली मदत पाहून त्यांनी कडू यांचे आभार मानले.