Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट ३०, २०२०

गडचिरोली जिल्ह्याचा चेहरा-मोहरा येत्या दोन वर्षात बदलणार; पंतप्रधानांनी घोषित केला आकांक्षी जिल्हा

पायाभूत सुविधांचा विकास करून पंतप्रधानांनी आकांक्षी म्हणून घोषित केलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा चेहरा-मोहरा येत्या दोन वर्षात बदलणार: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी




गडचिरोली जिल्ह्यातील 777 कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांचा उद्घाटन आणि कोनशिला समारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना आज श्री नितीन गडकरी म्हणाले की गेल्या सहा वर्षात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाद्वारा 541 किलोमीटर लांबीच्या 44 कामांना मंजुरी देण्यात आली यासाठी 1740 कोटी रुपयांचा खर्च झाला तसेच येत्या काळात गडचिरोली जिल्ह्यात 103 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे प्रस्तावित असून त्यासाठी 402 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या सर्व कामांमुळे पंतप्रधानांनी आकांक्षी म्हणून घोषित केलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करून या जिल्ह्याचा चेहरामोहरा येत्या दोन वर्षांत बदलला जाईल.




यावेळी बोलताना श्री नितीन गडकरी यांनी देसाईगंज पासून ब्रह्मपुरी पर्यंत ब्रॉडगेज मेट्रो निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवला यासाठी त्यांनी राज्य सरकारकडून सहकार्याची अपेक्षा केली या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ तसेच इंधन यात बचत होईल तसेच श्री गडकरी यांनी तांदळापासून इथेनॉल बनवणारे प्रकल्प सुरू करायला गडचिरोलीमध्ये खूप संधी असल्याचे देखील नमूद केले यावेळी ते पुढे म्हणाले की नुकतेच केंद्र सरकारने अगरबत्ती आयातीवर बंदी घातली आहे याचा फायदा घेऊन अगरबत्ती उत्पादन आणि बांबू क्षेत्रांमध्ये सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून 10,000 युवकांना प्रशिक्षित करून रोजगार देणे शक्य आहेत व या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत मुबलक नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या या जिल्ह्यांमध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर करून हा जिल्हा एव्हिएशन इंधनाचे केंद्र म्हणून बनवणे देखील शक्य आहे असे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी श्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की प्राणहिता नदी वरील निजामाबाद जगदलपूर महामार्गाचे काम करताना अभियंत्यांना नक्षली कारवायांचा त्रास झाला तर पाटागुडम जवळ इंद्रावती नदीवरील पुलाचे बांधकाम करताना संरक्षणासाठी खास पोलिस स्टेशनचे निर्माण करावे लागले. या तसेच इतर नैसर्गिक संकटांना सामोरे जात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांनी तसेच मजुरांनी ही कामे पूर्ण केली.

आजच्या समारंभामध्ये निजामाबाद ते जगदलपुर महामार्गावर प्राणहिता नदीवरील पूल तसेच इंद्रावती नदीवरील पूल, लंकाचेन राज्य महामार्गावरील पूल आणि इतर दोन कामाचे उद्घाटन करण्यात आले तर बांडिया नदीवरील आणि पर्लकोटा नदिवरील पुलाचे काम आणि इतर दोन कामांची कोनशिला ठेवण्यात आली.

यावेळी बोलताना रस्ते विकास आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग म्हणाले की जास्तीत जास्त संपर्क रस्ते बनवल्याने या भागातील नक्षली प्रभाव कमी होईल.या समारंभात बोलताना महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नमूद केले की आज उद्घाटन होत असलेला विकास कामांमुळे दुर्गम तसेच नक्षलग्रस्त भागांना उत्तम कनेक्टिविटी मिळेल आणि महाराष्ट्र तेलंगानाशी जोडला जाईल.



विकासाच्या राजवाटा

( पेरमिली पूल- पर्लकोटा पूल - बांडिया पूल)

रस्ते हा देशाच्या प्रगतीचा मूलभूत घटक म्हणता येईल कारण गावांना जोडणारे रस्ते हा जणू देशाचा आत्माच होय. महाराष्ट्रात विदर्भातील पर्यावरण संपन्न परंतु अतिदुर्गम असा आदिवासी बहुल जिल्हा म्हणजे गडचिरोली. या गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्या म्हणजे पेरमिली बांडिया आणि पर्लकोटा.

सद्यस्थितीतील या नद्यांवरच्या पूलाची उंची, रुंदी करतांना नागरीक आणि प्रवाशांची अक्षरश: फजितीच होते. या भागात अतिवृष्टीमुळे पूर आला की नद्यांवरील सेतुंना जणू जलसमाधी मिळते.

परिणामी हेमलकसा, भामरागड आणि लाहेरी या गावांतील जनजीवन विस्कळीत होऊन गावागावांतील संपर्क तुटून दैनंदिन वाहतुकीला मर्यादा येतात.

गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या या समस्या लक्षात घेऊन या भागात तीन नव्या सेतुंच्या बांधणीचे निर्देश दिले आहेत. NH-PWD या कामासाठी पुढे सरसावला आहे.

NH-130 D वरील - पेरिमिली बांडीया, पर्लकोटा नदीवरील पुलांची लांबी 1.175 कि.मी.. 1.270 किमी., 1.10 किमी. अनुक्रमे असणार आहे, 16 मीटर रुंदी तर ऊंची 12 मीटर असणार आहे. यासाठी अनुक्रमे 43 कोटी, 73 कोटी, 78 कोटी रुपये खर्च येणार आहे.

प्रभावी नक्षलचळवळी आणि पक्क्या रस्त्यांअभावी गडचिरोली जिल्ह्याचा तुटणारा संपर्क दूर होईल. तसेच भामरागड. हेमलकसा, लाहेरी या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांचा लाभ होत, रोजगाराला चालना मिळून विकासाचे नवे मार्ग मोकळे होतील.


गडचिरोली व चंद्रपूर जिल्हा यांच्या मधे वाहणारी वैनगंगा नदी महाराष्ट्र राज्यातील प्रमूख नद्यांपैकी एक आहे. वैनगंगावरील पूलाच्या सद्यस्थितीमुळे नागरिकांना आणि प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बल्लारपूर, कोठरी, गोंडपिंप्री आणि आष्टी येथील आदिवासी बहुल भागात राहणारया लोकांना रोजगार निर्मिती, शेती उत्पादनांची आयात व निर्यात, बाजारपेठ उपलब्धता, वैद्यकीय सुविधा, वाहतूक इत्यादी बाबत समस्यांचा सामना करावा लागला आहे.

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी वैनगंगा नदीवरील पुलाचे बांधकाम प्रस्तावित केले. या राष्ट्रीय महामार्ग 353 ब वरील हा महत्वाकांक्षी प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग पीडब्ल्यूडीमार्फत एकूण 99 कोटी रुपये खर्च पूर्ण करण्यात येईल. हा प्रस्तावित पूल गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्या खेड्यांमध्ये समृद्धी आणेल.




प्राणहिता, याच प्राणहिता नदीवर उभा आहे, अठरा स्तंभांसह तयार सुमारे 900 मीटर लांबीचा महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा भव्य सेतू!

सिरोंचा, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला एक तालुका. आदिवासी म्हणून ओळखला जाणारा आणि प्राणहिता, इंद्रावती, गोदावरी यांसारख्या बारमाही नद्यांचे नैसर्गिक वरदान लाभलेला हा भाग. परंतु या नद्यांमुळेच अनेकदा विकासामध्ये अडथळा निर्माण होत होता. माणसाची मूलभूत गरज असलेल्या वैद्यकीय सेवेकरिता साधारण दोनशे वीस किलोमीटरवर असलेल्या गडचिरोली किंवा चंद्रपूर या जिल्ह्यांच्या ठिकाणी जावे लागत असे. त्यापेक्षा तेलंगणातलं 50 किलोमीटर अंतरावरचं मंचेरियाल हे ठिकाण जवळ होतं खरं.. परंतु सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील रहिवासी लाकडी नौकेच्या सहाय्यानं नदी पार करीत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेकदा धोका पत्करत. आता मात्र या सेतूमुळे यांना दिलासा मिळाला आहे.

निजामाबाद मार्गे जगदलपूरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 63 वरचा हा सेतू महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगण या 3 राज्यांना जोडण्यात यशस्वी झाला आहे. या आदिवासी बहुल भागातील युवकांना रोजगाराची नवीन दालनं खुली करून देण्यात हा सेतू मोठी भूमिका बजावत आहे. फक्त दळणवळण, व्यापार एवढेच नाही तर रहिवाशांची सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध देखील विकसित होण्यात या सेतूची मोठी मदत झाली आहे.

माननीय नितीन गडकरींच्या ग्रीन कॉरिडोर संकल्पनेनुसार रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड देखील करण्यात आली, ती एनएच (पीडब्ल्यूडी) च्या पुढाकारानेच! पथदिव्यांनी सुशोभित हा सेतू देशाच्या प्रगतीमध्ये स्वयंप्रकाशित आधारस्तंभ बनत आहे यात काहीच शंका नाही....

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.