नागपूर/प्रतींनिधी:
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची आरोग्य विभागाची चमू अहोरात्र प्रयत्न करत आहे. सतरंजीपुराच्या त्या एक रुग्णामुळे २३५ च्या वर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने आपल्या वतीने तेथील ३० घरांमध्ये राहणा-या १५० नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठविले आहे. तथापि लोक याबददल माहिती देत नाही किंवा प्रशासनाची दिशाभूल करीत असल्यामुळे या कामात अडचण निर्माण होत आहे.
असेच एक प्रकरण शुक्रवारी रात्री (ता. २४) झाले. कळमना क्षेत्राच्या एका गोदामामध्ये लपून बसलेल्या १२ नागरिकांना मनपाच्या चमूने पोलिस विभागाच्या मदतीने पकडून त्यांना आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले.
सतरंजीपुराच्या एका नागरिकाला दोन दिवसापूर्वी त्याच क्षेत्रात आरोग्य विभागाच्या चमूने विलगीकरण कक्षात पाठविले. त्याला त्याच्या परिवाराबददल माहिती विचारली तर त्याने आरोग्य विभागाची दिशाभूल केली की त्याचा परिवार बिहारमध्ये आहे. आरोग्य विभागाच्या चमूने जेव्हा अधिकची माहिती घेतली तर माहिती मिळाली की त्याचा परिवार नागपूर मध्ये कुठेतरी दडून बसलेला आहे.
विजयनगर, कळमना येथील ज्या गोदामामध्ये त्या परिवाराने आसरा घेतला होता. त्याचा दिवा रात्रीच्या वेळेस सुरु झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली. त्यांनी पोलिसांना याबददलची सूचना दिली.
शुक्रवारी रात्रीला उशिरा आरोग्य विभाग मनपाची चमू आणि पोलिस विभागानी संयुक्तरित्या तेथे धाड टाकली आणि तिथे लपून बसलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात पाठविले. ही कारवाई मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात लकडगंज झोनचे झोनल अधिकारी डॉ.उमेश मोकाडे यांच्या उपस्थितीत झाली. कळमना पोलिस स्टेशनचे अधिकारी सुध्दा यावेळी उपस्थित होते.
मनपाला सहकार्य करा : आयुक्त
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अशाप्रकारे माहिती लपविणे हे दुर्देवी आणि क्लेशदायक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी भावनिक आवाहन करताना सांगितले की, नागरिकांनी पलायन करण्याऐवजी मनपाच्या चमूला सहकार्य करावे आणि आपला उपचार करुन घ्यावा. ज्या नागरिकांची कोरोना टेस्ट केली जाईल जर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी पाठविण्यात येईल. जर कोणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्याचा उपचार केला जाईल. त्यांनी आवाहन केले की नागरिकांनी समोर येऊन मनपाच्या चमूला सहकार्य करावे. जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागेल. नागरिकांनी नागपूरला कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आयुक्त म्हणाले.