चंद्रपुर/प्रतींनिधी:
आज कोरोना विषाणूमुळे अख्खे विश्व संकटाचा सामना करत आहे. भारतात दिवसागणिक कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच आहे. आपले घर, शहर सोडून आज अनेक आरोग्यदूत कोरोना रुग्णांच्या जीवनासाठी अहोरात्र लढा देत आहेत. असेच चंद्रपूरचे एक योद्धा डॉ. सुमेर शरद रामावत हे आपल्या चंद्रपूर शहररातील श्री. शरद रामवत यांचा मुलगा आहे जो सुरत येथे आपली जबाबदारी कर्तव्यदक्षतेने पार पाडत आहे.
महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी रामावत यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या आईवडीलांना शुभेच्छा दिल्या व आपले कर्तव्य बजाविणाऱ्या डॉ. सुमेर यांचे कौतुक केले.
चंद्रपूरचे असलेले डॉ. सुमेर शरद रामावत हे एमडी मेडीकल असून सध्या सुरत येथील शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत आहेत. कोरोना सेंटर आयसोलेशन विभाग येथे रुग्णांची सेवा करणे हे किती धैर्याचे काम आहे याची सर्वांनाच कल्पना आहे. या दरम्यान कोरोना सदृश रुग्णांशी संपर्क येत असल्याने पुरेशी काळजी न घेतल्यास कोरोना संसर्गाची शक्यता अधिक असते.
मात्र याची पुरेपूर कल्पना असून सम्पुर्ण देशातील आरोग्य यंत्रणा आपले काम पूर्ण जबाबदारीने करत आहे. चंद्रपूरचे डॉ. सुमेर शरद रामावत हे आरोग्ययोद्धा असून सुरत येथे आपले कर्तव्य बजावीत असल्याचा आपल्याला अभिमान आहे. त्यांचे जितके कौतुक केले तेवढे कमीच आहे. तसेच चंद्रपुरवासीयांकरीताही अभिमानास्पद बाब असल्याचे मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी नगरसेवक श्री. संदीप आवारी, श्री. संजय कंचर्लावार, श्री. रवी आसवानी उपस्थित होते.