मुंबई/ प्रतिनिधी
कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असलेतरी विलंब होतो अथवा लागत नाही, त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.राज्यातील सर्व महापालिका,नगरपालिका, नगरपंचायत च्या आयुक्त, मुख्य अधिकारी यांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळात सामान्य नागरिकांना मोठ्याप्रमाणात आर्थिक मंदी चा सामना करावा लागणार आहे, यात अनेकांची नोकरी जाण्याची सुद्धा शक्यता आहे, त्यामुळे सर्वांनी एप्रिल ते सप्टेंबर ची घरपट्टी माफ करून नागरिकांना सहकार्य करावे, आपल्या राज्यातील सर्व मोठ्या महापालिका ची आर्थिक स्थिती ही मजबूत आहे व मोठ्या प्रमाणात राखीव निधी या सगळ्यांकडे आहे. सध्याची स्थिती ही अनेक दशकांत पहिल्यांदाच उदभवली आहे, अशा वेळेस आपल्या नागरिकांना साथ देणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे. ऑक्टोबर पासून आपण ती घरपट्टी परत पूर्ववत करू शकता, असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे.