नागपूर /अरुण कराळे (खबरबात)
प्राध्यापक पती आणि डॉक्टर पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळले. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार १८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. धीरज राणे (वय ४१ वर्ष ), डॉ. सुषमा धीरज राणे ( वय ३९ वर्ष ), ध्रव धीरज राणे ( वय ११ वर्ष ) ववन्या धीरज राणे ( वय ५ वर्ष ) अशी मृतांची नावे असून ते संत जगनाडे सोयायटी, ओमनगर, कोराडी नाका येथे राहत होते.
धीरज राणे वानाडोंगरी (ता. हिंगणा) येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख तर डॉ. सुषमा या धंतोली, नागपूर येथील अवंती हॉस्पिटलमध्ये नोकरी करायच्या. घरी धीरज यांची आत्या प्रमिला ( वय ६५ वर्ष ) असून, तिने सकाळी बराच वेळ होऊनही भाचा, सून नातवांपैकी कुणीच बाहेर दिसत नसल्याने धीरज यांच्या खोलीचे दार ठोठावले. आवाजही दिले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे धीरजच्या आईने शेजारच्या किराणा दुकानदारास तसेच ओमनगरात राहणारे सुषमा यांचे बंधू रितेश सिंग यांना माहिती दिली. नंतर पोलिसांना कळविले.
माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. धीरज, धुव्र व वन्या यांचे मृतदेह एका खोलीत झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. त्या खोलीत इंजेक्शनच्या दोन रिकाम्या सिरिंज आढळून आल्या. पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या. डॉ. सुषमा यांचा मृतदेह घरातील दुसऱ्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सुषमा यांच्यासोबत आपले सोमवार १७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास बोलणे झाले होते, अशी माहिती धीरजच्या आईने दिली. राणे दाम्पत्य पैकी एकाने मुलांचे तिघांची हत्या करून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक संशय आहे.
या घटनेची वार्ता वायुवेगाने कोराडी आणि आजूबाजूच्या गावात पोहोचली. त्यामुळे मोठ्या संख्येत बघ्यांनी राणे दांपत्याच्या निवासस्थानासमोर गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम बोलवून घेतली. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही भेटी देऊन घटनेमागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वृत्त लिहिस्तोवर यासंबंधाने पोलिसांकडून अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. ऐन पोळ्याच्या दिवशी अत्यंत सुखवस्तू कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे पंचक्रोशीत उलट सुलट चर्चा केली जात आहे.