तु ही दाता.... तु ही विधाता....तुच रक्षणकर्ता
श्री भक्तांच्या मदतीला धावून या...........
सतीश बाळबुधे : यवतमाळ
गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता-दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे, अशी प्रत्येक गणेशभक्ताची भावना आहे. श्रीं हे भक्तांचे संकट हरतात, कोणत्याही भक्ताला दू:खात पाहू शकत नाही, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. या भयावह कोरोनाच्या संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी डॉक्टर, पोलिस बनून जणू ‘श्रीं’ साक्षात अवतरले, असा हुबेहूब देखावा साकारला आहे. तो यवतमाळ येथील एका तरुणांने. पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी 24 तास जिवाचे रान करीत ज्या प्रकारे कर्तव्य केले ते अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करण्याचा त्याचा मानस होता.
‘एक तरी अंगी असू दे कला नाही तर काय फुका जन्माला’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चार ओळीत कलेचे सार्थ दडले आहे. अशीच कला करण्याचा प्रयत्न यवतमाळ येथील अक्षय गावंडे यांनी केला आहे. अक्षय हे डिजायनर असून ते (प्लॅनर अॅण्ड इंटेरियर डिजायनर) ’निर्मिती कंस्ट्रक्शन’मध्ये अनेकांच्या स्वप्नात असलेले घरकूल प्रत्यक्षात साकारण्याचे काम करतात. कोरोना महामारीच्या काळात गेल्या चार महिन्यांपासून पोलिस, वैद्यकीय अधिकार्यांनी स्वत:च्या परिवाराचा विचार न करता नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्व समर्पण त्यागाची भावना स्विकारली. ताळेबंदीत नागरिकांना अन्नधान्याची व्यवस्था करणे, रुग्णांवर उपचार करणे, आदी कर्तव्य पोलिस व डॉक्टरांनी जबाबदारीने पार पाडली. कोरोना पसरू नये यासाठी ताळेबंदीचे नियम तोडणार्यांना पोलिसांनी प्रसादही दिला. त्यामुळेच का होईना, आज भारतात रुग्णांची संख्या इतर देशाच्या तुलनेत कमी आहे आणि आता अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी प्रशासनातील लहान, मोठ्या सर्वच अधिकार्यांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी हा देखावा साकारला असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अशातच चीन आणि भारतातील संबंध ताणल्या गेले होते. त्यात राफेल विमानाने प्रवेश करून भारतीय सैन्य दलाला सशक्त केले, याचा देखील देखावा ते साकारणार आहेत.
-------------------------------
प्रत्येक वर्षी नवनवीन काल्पनिक देखावे साकारणे यातून समाजोपयोगी संदेश देण्याचा प्रयत्न असतो. यावर्षी देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्याची इच्छा होती. पण कोरोनामुळे ही कल्पना सूचली. आणि कल्पना प्रत्यक्षात उतरवितांना या कलेत जिव ओतण्याचा प्रयत्न केला.
- अक्षय गावंडे, ’निर्मिती कंस्ट्रक्शन’
प्लॅनर अॅण्ड इंटेरियर डिजायनर
--------------------
मागू कसा मी, अन मागू कुणा
माझी व्यथा ही, समजाऊ कुणा
आहे उभा बघ दारी तुझ्या....
हे विघ्नहर्ता या जगावरील कोरोनाचे संकट दूर करा, अशी प्रार्थना प्रत्येक व्यक्ती करीत आहे. नागरिकांच्या प्रार्थनेला ‘श्री’ने मान्य करावी, यासाठी प्रत्येक जण वेगवेगळी उपासना करताना दिसून येत आहे. ‘श्रीं’शिवाय जिवन पूर्ण होऊ शकत नाही. जिथे भावपूर्ण श्रध्दा आहे तिथे भक्तीसुध्दा आहे.