Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै २१, २०२०

पडद्यामागील योद्धे करताहेत दररोज १२ - १४ तास काम



' मनपा कोरोना नियंत्रण कक्ष ' सतत कार्यरत

कर्मचारी एकही दिवस रजेवर नाही


चंद्रपूर २१ जुलै - कोरोनाचं जगभरात थैमान सुरु असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा राज्यात शिरकाव झाला. तेव्हापासून डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व इतर सहकारी जीवाची पर्वा न करता रुग्णांच्या सेवेत आहेत. १६ मार्चपासून चंद्रपूर शहर महानगरपालिका येथे ' कोरोना नियंत्रण कक्ष ' प्रस्थापित करण्यात आला. सदर नियंत्रण कक्षातील कर्मचारी आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून एकही दिवसाची रजा न घेता १२ - १४ तास दररोज काम करीत आहेत

क्वारंटाईन सेंटर मधील व्यक्तीची माहिती ठेवण्यापासून ते सॅनिटायझर, मास्क व इतर आवश्यक सामान पोहचविणे, कक्षातील मोबाईलवर येणाऱ्या नागरीकांच्या तक्रारी सोडविणे, शहरात पॉझिटीव्ह पेशंट आल्यास त्याची माहिती गोळा करून त्या पेशंटचे वास्तव्य असणारे ठिकाण सिल करणे, त्यांना हॉस्पिटलाईझ करणे, रेल्वेनी येणाऱ्या लोकांची माहिती गोळा करणे, चंद्रपूर शहरातील सर्व वार्डाचे ठिकाणी सर्दी - ताप - खोकला यासारखे आजार आढळुन आल्यास त्यांचा स्वॅब घेणे, शासननिर्देशित मोबाईल ॲपद्वारे नागरीकांचे स्वॅब घेणे जसे आरोग्य सेतु ॲप, सेफ्टी फर्स्ट ॲप इत्यादीमधुन मिळालेल्या माहितीच्या आधारे नागरीकांचे त्वरीत स्वॅब घेऊन तपासणी करणे, इत्यादी कामे कोरोना नियंक्षण कक्षात पडद्यामागील योद्धयांद्वारे अहोरात्र केल्या जात आहेत.

महापौर सौ. राखीव कंचर्लावार, उपमहापौर श्री. राहुल पावडे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, गजानन बोकडे यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. किर्ती राजुरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सदर कोरोना नियंत्रण कक्ष कार्यान्वित असून प्रत्येक व्यक्तीकडे जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मनपा क्षेत्रात आजपावेतो ४० पॉझिटीव्ह रुग्ण मिळाले असून २६ ठिकाणी कंटेनमेंट झोन करण्यात आले. पॉझिटीव्ह पेशंट आल्यास त्याचे अहवाल सादरीकरण तसेच पेशंटचे वास्तव्य सिल करण्याचे महत्वाचे काम शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधु करतात.

मनपा क्षेत्रात १८ क्वारंटाईन सेंटर आहेत. येथील संपूर्ण व्यवस्था महानगरपालिकेतर्फे सांभाळण्यात येते. येथील रुग्णांना आवश्यक ते साहित्य वेळेत पोहचविण्याची जबाबदारी प्रविण गुळघाणे सांभाळतात. श्रीमती सुकेशीनी बिलवणे लसीकरण संनियंत्रक म्हणुन काम करीत असून, हॉटस्पॉट एरिया, रेड झोन भागामधुन आलेल्या रुग्णांचा अहवाल गोळा करणे, तसेच चंद्रपूर शहरातील इतर आजार असलेले रुग्ण म्हणजेच ' कोमार्बीड ' रुग्ण शोधुन त्यांचा अहवाल गोळा करणे व आरोग्य सेतु बाबतचा अहवाल वरीष्ठांना सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

श्री. सतिश अलोने हे खाजगी दवाखान्यांच्या देखरेखीचे काम करीत असून क्वारंटाईन सेंटरचीही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. श्रीमती पायल गुरनुले यांचेकडे कोवीड १९ करीता लागणारे सर्व वैद्यकिय साहित्य खरेदी करण्यापासून ते पुरविण्यापर्यंतची जवाबदारी असून, आजपर्यंत एकूण ९५,११० मास्क, ११,३०९ सॅनिटायझर्स व इतर आवश्यक साहित्य मनपा मार्फत मोठया प्रमाणात वितरीत करण्यात आले आहे. श्रीमती पिंकी बावणे यांचेकडे रेल्वेनी शहरात आलेल्या लोकांचा अहवाल तयार करण्याचे काम असून, रेल्वेने आलेल्या एकुण ३६१४ लोकांची तपासणी मनपा आरोग्य विभागाने केली आहे. श्रीमती रितीशा दुधे यांचेकडे ८३०८८००२७६ या कोरोना हेल्पलाईन नंबरवर येणाऱ्या तक्रारी सोडविण्याचे काम आहे. दररोज साधारण ५० तरी तक्रारी येतात, पहिल्या लॉकडाऊनच्या टप्प्यात तर त्यांची संख्या २०० - २५० असायची. सोबतच आरोग्य सेतु तसेच कोवीड सदृश्य आजाराचे रुग्ण तपासून त्यांचा पाठपुरावा करुन अहवाल तयार करण्याचे काम यांचेमार्फत केल्या जाते.

पॉझिटीव्ह रुग्ण शोधण्यास महत्वाची भुमीका बजाविणाऱ्या सेफटी फर्स्ट ॲपचे काम श्री. गणेश राखुंडे यांच्याद्वारे केले जाते. श्रीमती भाविका राऊंत, श्रीमती सुषमा मोखाडे, श्रीमती शुभांगी मोडकवार, श्रीमती अश्विनी चव्हाण, श्री. सागर वंगलवार, श्री. लोमेश गंपलवार, श्री. वैभव मत्ते हे ही कोरोना नियंत्रण कक्षात अहोरात्र काम करीत असून, प्रत्येक काम वेळेवर आणि जबाबदारीने पुर्ण करीत आहे.

कोरोना नियंत्रण कक्षाला वेळोवेळी जिल्हास्तरावरून तसेच शासनाकडुन अहवाल मागविला जातो. ही महत्वाची माहिती पुरविणे आणि त्याचा तांत्रिकदृष्टया पाठपुरावा परिचारीका श्रीमती ग्रेस नगरकर तसेच श्रीमती शारदा भुक्या यांच्याद्वारे केला जातो. १४ मार्चपासून एकूण ११,८६७ नागरीक बाहेर राज्य तसेच जिल्ह्यातुन मनपा हद्दीत आले असून त्यापैकी १७५३ लोकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले तसेच १०,११४ लोकांना गृह विलगीकरण करण्यात आले. या प्रत्येक पेशंटचा अचूक अहवाल गोळा करणे आणि वरिष्ठांना तसेच शासनाला वेळोवेळी पुरविण्याचे काम त्यांच्यामार्फत केल्या जाते. त्यामुळेच आजपावेतो कोरोना बाबतच्या अहवाल हा समाधानकारक असून, याबाबत शासनस्तरावरून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.