चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (सीडीसीसी) बँकेतील २४ कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरभरती करून त्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर व बँकेचे सीईओ सिध्दार्थ दुबे यांनी काल २७ जुलैला दुपारी आर्थिक गुन्हे शाखेत शरणागती पत्करली होती. त्यानंतर त्यांना अटक करून आज दि.२८ जुलैला रामनगर पोलिस ठाण्यातून व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे न्यायालयात पेशी करण्यात आली. न्यायालयाने ३० जुलै पर्यंत दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे.
गड्डमवार यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात भादंवी 420, 471, 37 अन्वये अध्यक्ष पाऊणकर आणि सरव्यवस्थापक एस. एन. दुबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साडेपाच वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष असलेल्या मनोहर पाऊणकर यांच्यावर मध्यवर्ती बँकेच्या पदभरतीत फसवणुकीप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहेत. या प्रकरणी अध्यक्ष मनोहर पाऊणकर आणि बँक सरव्यवस्थापक एस. एन. दुबे यांच्या विरोधात पोलिसांनी तपास सुरु केला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि बँकेच्या सरव्यवस्थापकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकार कायद्यातील तरतुदी आणि पुरावे यांचा अभ्यास सुरु केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चंद्रपुरातील मध्यवर्ती कार्यालयातून काही महत्वाचे दस्तावेज पोलिसांनी ताब्यात घेतले.
अध्यक्ष व सीईओदोघेही फरार होते. या दरम्यान दोघांनीही जामिनासाठी जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही न्यायालयाने जामिन फेटाल्यानंतरही अध्यक्ष व सीईओ फरार होते. काल सोमवारी दुपारी अध्यक्ष मनोहर पाऊणकर व सीईओ दुबे यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मकेश्वर यांच्या समोर शरणागती पत्करली. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. आज त्यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने रामनगर पोलिस ठाण्यातून न्यायालयापुढे व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही ३० जुलै पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नेमकं प्रकरण काय?
चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेत ऑक्टोबर 2019 च्या नंतर अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया राबवण्यात आली. ही भरती करताना उमेदवाराकडून प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र मागवण्यात आलं होतं. पण हे प्रमाणपत्र अनेकांनी सदोष सादर केलं. त्यात तांत्रिक त्रुटी होत्या. असं असतानाही 24 उमेदवारांची भरती करण्यात आली. यात बँकेची फसवणूक करण्यात आली, असं तक्रारीत म्हटलं आहे.
विशेष म्हणजे भरती प्रक्रिया राबवताना अध्यक्षांनी संचालक मंडळाला विश्वासात घेतलं नाही. ही भरती पूर्णपणे नियमबाह्य असून, यात मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाली, असा आरोप करीत शिवसेना नेते संदीप गड्डमवार यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी चंद्रपुरातील रामनगर पोलिसांत तक्रार केली.
महत्त्वाचं म्हणजे बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर आणि संदीप गड्डमवार हे दोन्ही नेते शिवसेनेत आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या या पक्षातील स्थानिक नेत्यात हे राजकीय युद्ध सुरु असल्यानं सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून या बँकेची ओळख आहे. कोट्यवधींच्या ठेवी इथं आहेत. मात्र या प्रकरणामुळं ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.