डेक्कन कॉलेज, पुरातत्व संचालक,
पालिका प्रशासनाच्या बैठकीत निर्णय
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नरमधील ऐतिहासिक धाटणीच्या कॉटेज रुग्णालयाच्या वास्तूत होऊ घातलेल्या सातवहनकालीन वस्तूसंग्रहालयासाठीचा सामंजस्य करार होत असून लवकरच या वस्तूसंग्रहालाचे स्वप्न साकार होणार आहे. पुण्याचे डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ आणि जुन्नर नगरपालिकेच्या संयुक्त सहकार्यातून होणारा सामंजस्य करार आणि हस्तांतरणाबाबतची प्रक्रीया करण्यासाठी ही बैठक जुन्नर नगरपालिका मुख्याधिकारी कार्यालयात पार पडली.
डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु प्रसाद जोशी, माजी कुलगुरु आणि गुजरातच्या नॅशनल मरीटाईम हेरीटेज कॉर्पोरेशनचे महानिर्देशक
डॉ. वसंत शिंदे, राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने, सहयोगी प्रा.श्रीकांत गणवीर, जुन्नर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर,
बांधकाम विभाग प्रमुख व्ही. एन. देशमुख,माजी उपनगराध्यक्ष अॅड. राजेंद्र बुट्टे पाटील, सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे कार्याध्यक्ष जितेंद्र हांडे- देशमुख, सामाजिक कार्यकर्ते
रविंद्र काजळे यावेळी उपस्थित होते. जुन्नरच्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेकडून या सातवहनकालीन वस्तूसंग्रहालयासाठी पाठपुरावा सुरु आहे.
जुन्नर शहरातील सांस्कृतिक वारसा निश्चित करुन त्याचे संवर्धन व्हावे यासाठी शासनस्तरावर परंतू स्थानिक पातळीवर सांस्कृतिक ठेवा वारसा समिती गठीत करणे, पद्मावती तलावाचे सुशोभिकरणासाठी राज्य शासनाने ८ कोटी रुपये मंजूर केले आहेत.त्याचे सुशोभिकरण करताना गुजरातमधील वडनेर पालिकेच्या वतीने उभ्या राहत असलेल्या प्रकल्पाच्या अनुषंगाने आणखी काय सुविधा करता येतील.जुन्नर शहरात पंचलिंग चौकात उभारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक संग्रहालयाचे स्वरुप कसे असावे, तसेच किल्ले शिवनेरीच्या परिक्रमा मार्गाभोवती पर्यटनाच्या अनुषंगाने काय करता येईल.या बाबींची चर्चा प्रत्यक्ष भेट आणि पाहणी दरम्यान करण्यात आली.