मूल येथे कॉरेन्टाइन व कोवीड केअरची क्षमता वाढवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
चंद्रपूर शहरातील लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद
Ø सध्या 125 बाधितांवर उपचार सुरु
Ø 184 पॉझिटिव्ह कोरोना आजारातून बरे
Ø जिवती तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव
Ø विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई सक्त
Ø शहरात आज 157 अॅन्टीजेन चाचण्या
चंद्रपूर, दि. 21 जुलै : चंद्रपूर शहर, दुर्गापूर व ऊर्जानगर ग्रामपंचायत क्षेत्रात 26 जुलैपर्यंत सुरू असलेल्या लॉकडाऊनला नागरीकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद सुरू आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 2 पर्यंत उघडण्यात आली होती. आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात शहरात मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू असून महानगरपालिकेने 157 अँन्टीजेन चाचण्या देखील आज पूर्ण केल्या. मंगळवारी जिल्ह्यात फक्त 4 पॉझिटिव्ह पुढे आले असून जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी मुल तालुक्याचा आढावा आज घेतला. या ठिकाणची बाधितांची वाढती संख्या लक्षात घेत कोवीड केअर सेंटर व कॉरेन्टाइन सेन्टरची क्षमता वृद्धीचे निर्देश दिले.
चंद्रपूर शहर व परिसरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. साखळी तोडण्यासाठी व दुपटीने वाढ होण्याचा कालावधी कमी करण्यासाठी सध्या ब्रह्मपुरी, भद्रावती, चिमूर शहरा पाठोपाठ सर्वाधिक लोकसंख्येच्या चंद्रपूर शहरात देखील टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. 2 मे नंतर 88 दिवसानंतर बाधितांची संख्या दुप्पट झाली होती. मात्र नंतरच्या कालावधीत केवळ 105 दिवसात 261 बाधित पुढे आले आहे. जिल्ह्यामध्ये बाधितांची साखळी तोडल्या गेले नाही तर मोठ्या प्रमाणात संख्या वाढू शकते. अशावेळी आरोग्य यंत्रणेवर देखील ताण येऊ शकतो. त्यामुळे चंद्रपूर शहरात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदला नागरिकांनी आज 21 जुलैला पाचव्या दिवशी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्हची आकडेवारी पुढे येत होती. त्याला पायबंद बसण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी मुल शहरातील गेल्या काही दिवसातील बाधितांची वाढलेली संख्या बघता भेट दिली. तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. तसेच कोविड केअर सेंटर व विलगीकरण कक्षाची देखील त्यांनी यावेळी पाहणी केली. मूल तालुक्यांमध्ये बिहारमधून आलेल्या 24 राईस मिल कामगार नुकतेच पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्वतः भेट दिली आहे.
यावेळी घराघरात तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. याशिवाय जाणाळा येथील लग्न प्रसंगातून मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. अशा पद्धतीचे कोणतेही मोठे कार्यक्रम परिसरात होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यामध्ये वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालेल्या 309 बाधितापैकी 64 बाधित हे जिल्ह्या व राज्याबाहेरील आहेत. तसेच यातील चार बाधित अँटीजेन चाचणीतून पुढे आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 13 हजार 372 नमुने तपासण्यात आले आहे. यापैकी 12 हजार 286 नमुने निगेटिव्ह आले आहेत. 747 नमुने प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील 184 पॉझिटिव्ह कोरोना आजारातून बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. सध्या 125बाधितांवर उपचार सुरु आहेत.
मंगळवारच्या चार बाधितांमध्ये जीवती तालुक्यातील टेकामांडवा येथील 18 वर्षीय महिलेचा समावेश आहे. नांदेड शहरातून प्रवास केल्याची त्यांची नोंद आहे. जिवती तालुक्यातील ही पहिली नोंद आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील रहिवासी असणाऱ्या 28 वर्षाच्या युवकांचा समावेश आहे. तामिळनाडू राज्यातून 18 जुलै रोजी परत आलेल्या या युवकाला आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. 20 जुलै रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली या गावातील आणखी दोन जवळच्या संपर्कातील 22 वर्षीय व 55 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. यापूर्वी याच कुटुंबातील एक पुरुष पॉझिटिव्ह जाहीर करण्यात आला होता. 20 जुलै रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
- ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-38, बल्लारपूर चार, पोंभूर्णा तीन, सिंदेवाही चार, मुल 11, ब्रह्मपुरी 32, नागभीड पाच, वरोरा 9, कोरपना पाच, गोंडपिपरी तीन, राजुरा एक, चिमूर दोन, भद्रावती 6, जिवती एक बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर 9, वरोरा 16, राजुरा चार, मुल 30, भद्रावती 18, ब्रह्मपुरी-20, कोरपणा, नागभिड प्रत्येकी एक तर गडचांदूर चार बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एक, बाबुपेठ 10, बालाजी वार्ड दोन, भिवापूर वार्ड दोन, शास्त्रीनगर एक, सुमित्रानगर चार, स्नेह नगर एक, लुंबीनी नगर 4, जोडदेउळ एक, तुकूम तलाव दोन, दूध डेअरी तुकूम दोन, लालपेठ एक, पोलीस मंगल कार्यालय तुकूम 20, दाद महल वार्ड, शिवाजी नगर तुकुम, इंदिरानगर तुकुम, लालपेठ, भानापेठ, बगल खिडकी, हवेली गार्डन, नवीन वस्ती दाताळा, लखमापूर हनुमान मंदिर, घुटकाळा , आजाद हिंद वार्ड तुकूम , अंचलेश्वर गेट, संजय नगर, बगल खिडकी कोतवाली वार्ड, एकोरी वार्ड, रयतवारी वार्ड, जैन मंदिर तुकुम, साईनगर, क्रिस्टॉल प्लाझा याठिकाणचे प्रत्येकी एक बाधित तर पागल बाबा नगर तीन, वडगाव दोन, सिविल लाइन्स तीन असे एकूण बाधितांची संख्या 309 वर गेली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई:
- कोरोनाच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत दिनांक 21 जुलै रोजी जिल्ह्यात एकूण 7 हजार 174 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हात आतापर्यंत कोरोनाच्या काळात नियमांचे पालन न करणाऱ्या 58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 1 हजार 178 वाहने जप्त केली आहेत. 469 नागरिकांवर एफआयआर दाखल केले आहे. आतापर्यंत एकूण 32 लाख 27 हजार 574 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. प्रशासनाने जारी केलेले नियम व सुचनांचे उल्लंघन केले तर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.