Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै १८, २०२०

कोरोनाने शहरात एकही मृत्यू नाही; शकुंतला लॉनवरील स्क्रीनिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे यश

महाराष्ट्रातील मनपा क्षेत्रात चंद्रपूर महानगरपालिकेची सरस कामगिरी 

 


चंद्रपूर १८ जुलै - चंद्रपूर शहरात फक्त कोरोना विषाणूची लागण झाल्याने एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. २ मे रोजी चंद्रपूर शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन चंद्रपूर शहर महानगरपालिका, आरोग्य विभाग यांनी अतिशय चिकाटीने काम करण्यास सुरवात केली. शहरातील प्रत्येक घरात पोहचून नागरिकांची आरोग्यविषयक पाहणी मनपा आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे केली गेली. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्याच्या प्रयत्नांबरोबरच प्रत्येक रुग्णाचे प्राणही वाचविण्याचे काम मनपाद्वारे केले जात आहे. प्रशासनच्या उपाययोजनांना नागरीकांच्या सहकार्याची जोड मिळाल्याने कोरोनाविरोधाच्या लढाईत अतिशय सरस कामगिरी चंद्रपूर महानगरपालिका बजावीत आहे. 
 
चंद्रपूर शहरात प्रवेश करण्याआधी ' शकुंतला लॉन ' वर आरोग्य तपासणी ( स्क्रीनिंग ) करणे बंधनकारक आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सांभाळले जाणारे हे तपासणी केंद्र २४ तास सुरु राहते. आयुक्त श्री. राजेश मोहिते यांनी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. किर्ती राजुरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात शकुंतला लॉन येथील नोडल अधिकारी म्हणुन डॉ. विजया खेरा यांच्याकडे जबाबदारी सोपविलेली आहे व त्यांना सहाय्यक म्हणुन शरद नागोसे काम बघत आहेत. 
 
स्क्रीनिंग दरम्यान इतर देश, राज्य, जिल्हा, शहरातुन, वाहनाने, रेल्वेने आलेल्या व्यक्तींची मागील २८ दिवसांपासूनची माहिती घेतली जाते यात कोणत्या भागातुन आले, इथला संपूर्ण पत्ता, कुठे थांबले, कुठे भेट दिली, कोणत्या वाहनाने आले, मोबाइल क्रमांक अशी संपूर्ण माहिती घेऊन ट्रॅव्हल हिस्ट्रीचा माग काढला जातो, ट्रेसिंग केले जाते. त्यानंतर त्यांना इंस्टिट्युशनल क्वारंटाईन केले जाते किंवा त्यांची इच्छा असल्यास स्वखर्चाने हॉटेल क्वारंटाईन मध्ये पाठविण्यात येते. कुणीही प्रशासनाला न कळविता शहरात प्रवेश केल्यास अश्या नागरीकांचा मागोवा महानगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे घेण्यात येतो. यात नागरीकांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळते. आरोग्य कर्मचारी अश्या व्यक्तींच्या घरी पोहचतात व त्यांना क्वारंटाईन केले जाते. क्वारंटाईन केल्यावर त्यांची स्वॅब तपासणी करण्यात येते, परिणाम पॉझिटिव्ह आल्यास विलगीकरण कक्षात ( आयसोलेशन वॉर्ड ) ठेवण्यात येते व त्यांच्यावर उपचार कोव्हीड केअर सेंटर मधे करण्यात येतात.

प्रशासनाला न कळविता शहरात दाखल झाल्याने एफआयआरची कारवाई सुद्धा मनपा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे यादृष्टीने व्यवस्था शकुंतला लॉनवर करण्यात आली आहे. पावसाचा त्रास होऊ नये या दृष्टीने वॉटरप्रुफ शेड, ठराविक अंतरावरील बसण्याची व्यवस्था, जनजागृतीसाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे बॅनर, होर्डिंग, प्रवेश करतांना निर्जंतुकरणाची व्यवस्था महानगरपालिकेद्वारे करण्यात आल्या आहेत. 
 
कोरोना संकटात इतर शहर, जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात लोकांनी चंद्रपूर शहरात प्रवेश केला. ८ मे पासून १३,३३९ नागरीकांची स्क्रीनिंग येथे करण्यात आली. शकुंतला लॉन येथील स्क्रीनिंगच्या माध्यमातुन बाहेरगावाहून येणाऱ्या व्यक्तींना इंस्टिट्युशनल क्वारंटाईन आणि बाधित असणाऱ्यांवर त्वरीत उपचाराने त्यांना गंभीर स्थितीत जाण्यापासुन प्रतिबंधित करण्यात येते. महानगरपालिका, आरोग्य विभागाच्या गतीने कार्य करण्याच्या व योजनाबद्ध कार्यपध्दतीमुळेच आज या गंभीर आजाराने चंद्रपूर शहरात एकही मृत्यू झालेला नाही.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.