माहिती अधिकारातून फुटले बिंग
नागपूर / अरूण कराळे (खबरबात )
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर लगतचे दत्तक ग्राम फेटरी येथील एका महिलेकडे अमरावती मेडिकल बोर्डाचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आढळून आले आहे. या प्रकरणामुळे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनविणारे राज्यव्यापी रॅकेट सक्रिय असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर तालुक्यातील फेटरी येथील रहिवासी सविता राजेंद्र सेवतकर हिने दि. २६ एप्रिल २०२० रोजी ग्रामपंचायतीकडे दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक ४७८०९ जावक क्रमांक पीआय/१६३०/दि.२/८/२०१८ नुसार प्रमाणपत्र जोडून शासकीय लाभ मिळण्याची विनंती केली. यावेळी हजर असलेले डॉ. विजय पवार यांना सदर दिव्यांग प्रमाणपत्राविषयी शंका आली. वर्हाडा ता. पारशिवनी, जि.नागपूर येथील माहेर असलेली अर्जदार महिला लग्नानंतर फेटरीवासी झाली. तिचे सासरच्या नावावर आधार कार्डसुद्धा बनलेले आहे. तरीही मेडिकल बोर्डाच्या दिव्यांग प्रमाणपत्रावर साईनगर, अमरावती असा पत्ता का नोंदण्यात आला? हा प्रश्न डाॅ. विजय पवार यांना पडला. त्यांनी गेल्या १ जून २०२० रोजी अमरावतीच्या इर्विन हॉस्पिटलस्थित मेडिकल बोर्डाकडे माहिती अधिकार कायद्यान्वये दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला.
त्यावर जनमाहिती अधिकाऱ्याने पत्राद्वारे जा.क्र.जिरुअम/माहितीचा अधि.अधिनियम २००५/ १६३९९ /२०२० / दि . २/ ७ / २०२० नुसार कळविले की, सदर दिव्यांग प्रमाणपत्रधारक सौ. सविता राजेंद्र सेवतकर यांची प्रमाणपत्राची तपासणी केली असता सदर प्रमाणपत्राची अपंग नोंदवहीमध्ये नोंद नसून सदर प्रमाणपत्र बनावट आहे. त्यावरील तज्ञांची सही बनावट असल्याबाबतचे निदर्शनास आलेले आहे असेही माहितीमध्ये नमूद केलेले आहे.
त्यानंतर डॉ. पवार यांनी या बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या या गंभीर प्रकरणाची तक्रार फेटरी ग्रामपंचायत, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी तसेच पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी यांच्याकडे दिली आहे. यात त्यांनी सविता सेवतकर हिच्याविरुद्ध भादंविच्या कलम४१९ ( तोतयेगिरीद्वारे ठकवणूक), ४२० ( फसविणे), ४६८ ( फसवणुकीसाठी बनावटीकरण), ४६९ ( लौकीकास बाधा आणण्यासाठी बनावटीकरण), ४७० ( बनावट दस्तऐवज) व ४०६ ( फौजदारीपात्र न्यायभंगाबद्दल) अन्वये पोलिसात गुन्हे नोंदविण्याची विनंती केली आहे.
सौ.सविता सेवतकर हिने रेल्वेची प्रवास सवलत पाससुद्धा काढल्याची माहिती आहे. तिने मेडिकल बोर्डासारखे हुबेहूब दिव्यांग प्रमाणपत्र शासकीय योजनांचा लाभ लाटण्यासाठी बनविले आहे. यावरून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनविणारे राज्यव्यापी रॅकेट तर सक्रिय नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचे रॅकेट नेस्तनाबूत करावे, अशी मागणी डॉ.विजय पवार यांनी केली आहे .
विशेष म्हणजे, सविता हिचे पती राजेंद्र सेवतकर आणि अन्य एकाने चार महिन्यांपूर्वी दिव्यांग निधीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप लावत फेटरी ग्रामपंचायतीविरुद्ध साखळी उपोषण केले होते. त्यांच्या या उपोषणाला भाजप, शिवसेना आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने जोरदार पाठिंबा दिला होता. या आरोपांच्या चौकशीत काहीही निष्पन्न झाले नसतानासुद्धा प्रशासनाने ग्रामसेविकेची तडकाफडकी बदली केली होती. डॉ. पवार यांनी तक्रार दिल्याच्या चार दिवसानंतरही प्रशासनाकडून याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यात आले काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. फेटरी ग्रा.पं.च्या भूमिकेकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.