प्रत्येकाच्या नावाची नोंद; 2 तासाने निर्जंतुकीकरण आवश्यक
चंद्रपूर(खबरबात):
जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु या लॉकडाऊन मध्ये गेल्या काही महिन्यांपासून सलून, स्पा, केस कर्तनालय हि आस्थापने,दुकाने बंद होती. सदर आस्थापना रविवार दिनांक 28 जून पासून अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरू होणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने यासंबंधीचा निर्णय कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यात आज या संदर्भात आदेश निर्गमित केलेला आहे. सलून,स्पा,बार्बर शॉप, ब्युटी पार्लर, केस कर्तनालय इत्यादी दुकाने,आस्थापना सुरू करण्याबाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. सलून,स्पा, केस कर्तनालय या आस्थापना सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील. आस्थापना,दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी यांनी हॅन्डग्लोव्हज,अॅप्रन व मास्क इत्यादी संरक्षणात्मक साहित्याचे वापर करणे बंधनकारक राहील. तसेच दुकानात हॅन्ड सॅनिटायजरचे वापर करून एका वेळेस कमाल एकच्या मर्यादेत सामाजिक अंतर राखून ग्राहकांना प्रवेश द्यावा.
प्रत्येक ग्राहकानंतर खुर्चीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. तसेच दुकानातील फरशी, कॉमन क्षेत्र यांची दर दोन तासांनी नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील.
ग्राहकांकरिता डिस्पोजेबल टॉवेल, नॅपकिन वापरणे बंधनकारक राहील. त्याप्रमाणे डिस्पोजेबल उपकरणे प्रत्येक सेवेनंतर स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील.
खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती फलक दुकानाचे दर्शनी भागावर लावावी. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांची नोंद (नाव, संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक) नोंदवहीत घेण्यात यावी.
सदरील आदेशांचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, 269, 270,271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल सदरचा आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 27 जून ते 30 जून या कालावधीत करीता लागू राहील तसेच प्रतिबंधित क्षेत्राकरिता (कंटेनमेंट झोन) लागू राहणार नाही.