व्यवस्थेची केली पाहणी
संजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 24 मे 2020
नवेगावबांध :-सध्या गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे वाढते प्रमाण हा जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय झाला आहे. एकट्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात जिल्ह्यातील चाळीस बाधित रुग्णांपैकी 26 रुग्ण आढळले आहेत. आणखी बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोविड केअर सेंटर नवेगाव बांध ,अर्जुनी मोरगाव येथे आहेत.
आज दिनांक 24 मे रविवारला अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांनी येथील कोविड केअर सेंटर भागरताबाई आत्माराम डोंगरवार विद्यालय नवेगाव बांध येथे भेट दिली. केअर सेंटर मध्ये असलेल्या सुविधा व विलगीकरण ठेवलेल्या 28 नागरिकांच्या व्यवस्थेबाबत पाहणी केली. तसेच विलगीकनात असलेल्या व्यक्तींशी सुद्धा आस्थेने विचारपूस करून त्यांच्याशी हिटगुज साधले.
याचप्रमाणे एसएसजे महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथील कोरोना केअर सेंटरला सुद्धा भेट दिली. बाहेर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून शिक्षणासाठी, रोजगारासाठी गेलेल्या नागरिकांचे लोंढे तालुक्यात परत येत आहेत. यावर अर्जुनी-मोर तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे. जिल्हा सीमेवर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गौरनगर व भिवखिडकी चेक पोस्टवर तालुका प्रशासनाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणखी कोव्हिड केअर सेंटर स्थापन करण्याच्या प्रशासनाच्या हालचाली चालल्या आहेत.असे समजते.
यावेळी तहसीलदार विनोद मेश्राम अर्जुनी मोर, अर्जुनी-मोर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत , ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध चे वैद्यकीय अधीक्षक तथा केंद्राचे प्रभारी डॉ. सुरेंद्र टंडन, वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश कापगते, ठाणेदार दिनकर ठोसरे ,अर्जुनी मोरगाव चे खंडविकास अधिकारी मयूर अंदेलवाड, जाधव मॅडम, दीपक जाधव ठाणेदार केशोरी , डॉ. घरतकर, ठाणेदार तोंडले, अनुप भावे विस्तार अधिकारी, कापगते तलाठी उपस्थित होते.