वेबिनारच्या माध्यमातून वीज ग्राहकांशी चर्चा करताना प्रादेशिक संचालक (प्रभारी) सुहास रंगारी, मुख्य अभियंता (प्रभारी)दिलीप दोडके |
नागपूर/प्रतिनिधी:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या परिस्थितीत महावितरणच्या विविध वर्गवारितील सर्व ग्राहकांच्या वीज पुरवठ्याविषयीच्या समस्या जाणून घेण्यासाठी महावितरणच्या नागपूर परिमंडलाच्यावतीने आज २९ मे ला वेबिनारव्दारे ग्राहकांशी संवाद साधण्यात आला .
या वेब संवादात मोठ्या संख्येत सहभागी होऊन ग्राहकांनी या उपक्रमाचे स्वागत केले तसेच आपल्या वीज विषयक समस्यांचे ऑनलाईन निराकरण होत असल्याबद्दल समाधानही व्यक्त केले. नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक (प्रभारी) सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता (प्रभारी) दिलीप दोडके यांनी यावेळी ग्राहकांशी सवांद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. तसेच महावितरणच्या विविध सेवांची माहितीही ग्राहकांना उपलब्ध करून दिली.
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे लॉकडाऊन सुरू असल्याने ग्राहकांच्या विविध तक्रारीचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांशी 'वेबिनार' किंवा व्हिडिओ कॉन्फरंन्सचे संवाद साधण्याचे आदेश ऊर्जा मंत्री. ना. डॉ. नितिन राऊत यांनी दिले होते . त्यानुसार नागपुर प्रादेशिक विभागात त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. सुहास रंगारी यांनी दिले होते. त्या अंतर्गत नागपूर परिमंडलाच्यावतीने या 'वेबिनार 'संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेब संवादात नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या वेबिनार संवादात ग्राहकांनी विजपुरवठा, विजबिल, वीज यंत्रणा ,नावात बदल,सबसिडी, इत्यादी सेवांबाबत अडचणी मांडल्या. यातील बहुतांश समस्यांचे निराकरण तात्काळ करण्यात आले. ज्या समस्या किंवा प्रश्न मुख्यालय आणि धोरणात्मक बाबीशी संबधीत होते, त्याचा पाठपुरावा वरिष्ठ स्तरावर करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. या वेब संवादात नागपूर व वर्धा जिल्हा कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सर्वश्री नारायण आमझरे, अविनाश सहारे, हरीश गजबे, डॉ. सुरेश वानखेडे , उप महाव्यस्थपाक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते ,सर्व उपविभागीय अभियंते सहभागी झाले होते.