Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे २९, २०२०

विद्यार्थ्यांचा हट्ट आणि पालकांची धावपळ- मोबाईलची मागणी वाढली




पहिले मोबाईल, नंतर शाळा : ऑनलाइन शिक्षणाचा प्रभाव




राजुरा/(जिल्हा चंद्रपूर)
आनंद चलाख
कोरोना महामारीच्या संकटात दोन महिन्यापासून देशात लाक डाउन सुरू आहे. कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मार्च महिन्यातच शाळा बंद केल्या. आपात्कालीन स्थितीमुळे शाळातील द्वितीय सत्राच्या परीक्षा रद्द झाल्या. कोरोणा विरुद्ध लढताना घरी सुरक्षित राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यात ऑनलाईन शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. याचा परिणाम खेड्यापाड्यातील पालकांवरही झालेला आहे. शैक्षणिक भवितव्यासाठी पालकांची गर्दी आता मोबाईल शॉपी मध्ये वाढलेली आहे. पहिले मोबाईल, नंतर शाळा अशी अवस्था नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याअगोदरच झालेली आहे.


लाकडाऊनच्या काळातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य अखंडित रहावे यासाठी शिक्षण विभागाने उपायोजना केली. ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हाट्सअप ग्रुप बनविण्यात आले.या अनुषंगाने शाळांतील शिक्षकांनी पालकांचे व्हाट्सअप नंबर शोधण्याची शोधमोहीम सुरू केली. पालकांचे व्हाट्सअप ग्रुप बनवून पालकांना व विद्यार्थ्यांना उपक्रमाची माहिती देण्यात आली. महिनाभरापासून शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू केलेले आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 'शाळा बंद - पण शिक्षण सुरू आहे' या सदराखाली राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचेकडून प्रत्येक विषयावर ऑनलाईन माहिती देण्यात येत आहे. वर्गनिहाय व विषय निहाय शैक्षणिक लिंक व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित करण्यात येत आहे.

हा उपक्रम लाकडाऊनमध्ये सुरू झाल्यामुळे अँड्रॉइड मोबाईल नसणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित रहावे लागले.मात्र याबाबतची सूचना सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याने विद्यार्थ्यांचा मोबाईलसाठी हट्ट सुरु झाला. पालकांनाही याबाबतची पूर्वकल्पना असल्यामुळे आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी मोबाईल खरेदी साठी जुळवाजुळव सुरू केली. बाजारपेठ सुरू होताच

आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी मोबाईल शॉपिंग मध्ये गर्दी केली. मात्र संपूर्ण उद्योगधंदे बंद असल्यामुळे मागणीनुसार पुरवठा कमी आहे. पालक आठवडाभरापासून मोबाईल खरेदीसाठी वेटिंगवर आहेत. काही वर्षांपूर्वी शालेय वेळात शाळातून मोबाईल वापरावर प्रतिबंध घालण्यात आले होते. मात्र काळानुरुप त्याच मोबाईल ने ऑनलाईन शिक्षणात आपले महत्त्व सिद्ध केले आहे. बदलत्या काळानुरूप मोबाईलचे महत्त्व वाढले आहे. कोरोनामुळे संपूर्ण जग हादरलेले आहे. मागील दोन महिन्यापासून टाळेबंदी सुरू असल्यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प आहे. चौथ्या लाकडाऊन मध्ये शिथीलता मिळाल्यानंतर मोबाईल खरेदीसाठी मोबाईल शॉपी मध्ये पालकांची गर्दी झाली आहे. बदलत्या जीवनशैलीचे चित्र अधोरेखित करीत आहे.

**************

मागणी जास्त , पुरवठा कमी.


********************

ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइल खरेदी अचानक वाढली आहे. मात्र लाकडाऊन असल्यामुळे मोबाईलचा पुरवठा बंद आहे. मागणीनुसार मोबाईल पुरवठा होत नसल्यामुळे ग्राहकांना अपेक्षेप्रमाणे मोबाईल मिळत नाही. जिल्ह्याच्या होलसेलरकडे मागणीनुसार मोबाईल उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रिटेल दुकानदारांच्या मोबाईल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.मर्यादित मोबाईल पुरवठा होत असल्याने ग्राहकांमध्ये चढाओढ निर्माण झालेली आहे.

************"*******"*****



लाकडाऊन मध्ये शिथीलता मिळाल्यानंतर आम्ही दुकाने सुरू केलेली आहेत. मागील आठवडाभरापासून अँड्रॉइड मोबाईलची मागणी वाढलेली आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी पालकांकडे आग्रह धरीत आहेत. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालक दररोज मोबाईल खरेदीसाठी येत आहेत. माझ्या दुकानातून जवळपास दररोज 15 ग्राहक वापस जात आहेत. मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे मोठ्या संख्येने पालक प्रतीक्षेत आहेत.

दीपक रागीट, मालक,

लक्ष्मी मोबाईल शॉपी, राजुरा..


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.