नागपुर(खबरबात):
राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. कडकनाथ कोंबडी पालनाच्या व्यवसायातून अल्पावधीत लाखोंचा फायदा मिळतो, अशी खोटी माहिती देऊन कंपनीत रक्कम गुंतविण्यास भाग पडणाऱ्या सांगली जिल्ह्यातील दोघांनी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ कोटी, ६० लाख रुपयांचा गंडा घातला.
मागील अनेक दिवसापासून आरोपींकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पीडित शेतकऱ्यांना फसविण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे फिर्यादीने
बजाजनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार नोंदविली. सुधीर शंकर मोहिते (वय ३०, रा. वडेगाव, कडेगाव, जी. सांगली) आणि संदीप सुभाष मोहिते (वय 3०, रा. इस्लामपूर, जि. सांगली) अशी आरोपींची नावे आहेत.
त्यांनी महा रयत अँग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तसेच रयत अँग्रो इंडिया लिमिटेड या दोन कंपनी आपल्या मालकीच्या असून कंपनीमार्फत शेतकऱ्यांना आर्थिक फायद्याच्या वेगवेगळ्या योजना समजावून सांगितल्या होत्या. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आणि शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायाचे स्वरूप समजावून सांगितले. यातून भरगोस उत्पन्न मिळवता येईल व कमोड दिवसात जास्त नफा कमवीता येईल असे सांगून त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून वेगवेगळी रक्कम जमा केली. मूळचे न्यू कॉलनी, फेज नंबर २ ,नवी दिल्ली येथील रहिवासी असलेले मात्र सध्या कळमेश्वर तालुक्यातील सेलू गुमथळा गावात राहणारे विकास बळवंत मेश्राम यांनाही हेच आमिष दाखविले आणि मेश्राम आणि अन्य ११० शेतकऱ्यांकडून एकूण १ कोटी, ६० लाख, ५६० रुपये गोळा करून आरोपींनी काशा गुंडाळला. त्यांनी केलेल्या करारानुसार कोणत्याही प्रकारचा लाभ पैसे गुंतविणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला नाही. कराराचे पालनही झाले नाही.
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हे प्रकरण बाहेर आलं आणि त्याला राजकीय रंगही मिळाला, आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर सरकार बदललं. दरम्यानच्या काळात पोलिसांनीही काही कारवाई केली.काही अटका झाल्या, काहींच्या ताब्यासाठी न्यायालयात जावं लागलं. वेळ जातो तशी चर्चा कमी होत जाते. पण जी घरं, जे संसार कडकनाथच्या या उद्योगात होरपळले ते अजूनही तसेच आहेत.
सांगली, सातारा, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातली गावंच्या गावं या कोंबड्यांच्या व्यवसायात अडकली आहे,जणू प्रत्येक गावच या घोटाळ्याचं शिकार बनलं आहे.अनेक शेतकर्यांची आयुष्यभराची कमाई गेली.
इस्लामपूरमध्ये या कंपनीचं मुख्य कार्यालय होतं आणि पुण्यात कॉर्पोरेट ऑफिस होतं. कंपनी सुरुवातीला कोंबड्या देईल, त्यांच्यासाठी खाद्यही पुरवेल आणि नंतर कालांतरानं अंडी आणि कोंबड्या विकत घेईल. सुरुवातीच्या काळात अनेकांना लाखो रूपये फायदा झाल्याचं सगळ्यांनी बघितलं.
साठ रुपयापर्यंत अंडं जातंय, पाचशेपेक्षा जास्तीला कोंबडी जाते असं सांगितल्यावर लोकांनी आणखी पैसे घातले. गावातल्या गावात लोक एकमेकांचं बघून चांगला फायदा मिळेल असं म्हणून पैसे गुंतवत होते. कोणी कर्ज काढून तर कोणी नातेवाईकांकडे पैसे मागून मोठ्या नफ्याच्या आशेनं हा व्यवसायच्या भानगडीत पडले.
कंपनीने सुरुवातीला खाद्य दिल. नंतर ते थांबलं तेव्हा अनेकांनी पदरमोड करून कोंबड्यांना जगवलं. पण कोंबड्याच इतक्या होत्या की ते फार काळ खर्च करू शकले नाहीत. काही कोंबड्या मेल्या, काही मिळेल त्या भावात विकल्या.
सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते पैसे देणे तर दूरच पण , शेतकऱ्यांना प्रतिसादच देत नसल्याने फसवणूक केल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्वांच्यावतीने मेश्राम यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्याची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते या दोघांविरुद्ध कलम ४०६, ४०९,४२०,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.