गृह विलगिकरणात असताना बाहेर फिरून पसरविला संसर्ग
वर्धा(खबरबात):
मुंबईहून सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता वर्धा जिल्ह्यात आलेली सायन येथील परिचारिका आणि तिच्या पतीवर गृह विलगिकरणाचे नियम मोडून कोरोनाचा संसर्ग पसरविल्याबाबत आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंगी मेघे येथील परिचारिका मुंबई येथून 16 मे रोजी वर्धा जिल्ह्यात आली. तिने कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतली नाही. जिल्हा बंदी असताना सदर महिला वर्धा जिल्ह्यात दाखल झाली. मुंबईहून आल्यावर वर्धेत आल्याची कुणालाही माहिती दिली नाही व आरोग्य तपासणी सुद्धा करुन घेतली नाही. आरोग्य विभागाने 21 मे रोजी संपूर्ण कुटुंब गृह विलागीकरण केल्यावर सुद्धा तिचे पती गावात इतरत्र फिरत होते.
सदर महिला आज कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असून महिलेच्या पतीने कुणाच्याही संपर्कात न आल्याची खोटी माहिती दिली. मात्र प्राप्त माहितीनुसार महिलेचा पती गावभर फिरत असल्याचे उघड झाले असून त्यांनी कोरोनाचा संसर्ग पसरविल्याबाबत नोडल अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून परिचारिका आणि पती विरुद्ध सावंगी मेघे पोलीस ठाण्यात भा दं वि 1860 च्या कलम 188, 269, 270 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 00000