नागपूर(खबरबात):एकीकडे लॉक डाऊन सुरु आहे तर दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढत आहे. वाढत्या उष्म्यापासून दिलासा मिळावा म्हणून नागरिकांनी कूलरचा वापर सुरु केला आहे. कूलरचा वापर करतेवेळी विजेचा धक्का लागून प्राणांतिक अपघात झाल्याच्या घटना विदर्भात दरवर्षी घडत असतात. यामुळे कूलरचा वापर करताना किंवा हाताळताना काळजी घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
कूलरमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी सदैव थ्री पिन चा वापर करण्याचे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी घरी अथवा दुकानात अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर लावून घ्यावे. या उपकरणामुळे विजेचा धक्का बसताच वीज प्रवाह खंडित होऊन पुढील अनर्थ टाळता येतो. घरातील अर्थिंग योग्य असल्याची खात्री करून घ्या.
शक्यतो लोखंडी बाह्यभाग असणाऱ्या कूलर ऐवजी फायबर बाह्यभाग असणाऱ्या कूलरचा वापर करणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कधीही चांगले आहे. कूलरमध्ये पाणी भरतेवेळी वीज प्रवाह बंद करून, प्लग काढून त्यात पाणी भरावे. ओल्या हाताने चुकूनही कूलरला स्पर्श करू नका. कूलरच्या आतील भागातील वीज तारा पाण्यात बुडाल्या नाहीत ना याची खात्री करून घ्या. लहान मुले कूलरच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्या. विदर्भात दरवर्षी अनेक ठिकाणी लहानश्या चुकीमुळे लहान मुलांचे जीव गेल्याचा घटना घडल्या आहेत.
उन्हाळ्यात सर्वांना गारवा तर हवा असतो. पण यासाठी आपले थोडेसे दुर्लक्ष मोठ्या अपघाताला आमंत्रण देऊ शकते.यामुळे कूलर हाताळताना काळजी घेण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी वीज ग्राहकांना केले आहे.