चंद्रपूर,दि. 1 एप्रिल: राज्यामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतच आहे.यासाठी राज्यातील सरकारी यंत्रणा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस-रात्र लढा देत आहे.या लढ्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी आपल्या नेतृत्वात सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव ठेवून जनतेची सेवा देण्यासाठी दिवस-रात्र व्यस्त राहून कामकाज करीत आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या उपाययोजनेसाठी सहभाग म्हणून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर कडून जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांचे 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
माहे एप्रिल 2020 चे वेतनातून जिल्ह्यातील सर्व पदोन्नत नायब तहसीलदार, अव्वल कारकून, कनिष्ठ लिपिक यांचे एक दिवसाचे वेतन कोरोना लढा निधी म्हणून देणार आहे.
शिपाई संवर्गातील कर्मचारी बांधव याकामी संमती देत असल्यास इच्छुक मदतीचे आवाहन देखील चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू धांडे यांनी केले आहे.
स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनांतर्गत केले जात आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. यामध्ये धनादेश,डीडी अथवा ऑनलाईन निधी देऊ शकता.
या खात्यामध्ये जमा करता येणार मदत :
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19,बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया,मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023,शाखा कोड 00300 आयएफएससी कोड SBIN0000300 या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी मदत करता येणार आहे. सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.