नागपूर/प्रतिनिधी:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धतता योग्यरित्या होते आहे किंवा नाही याबाबत "याची देही याची डोळा" जाणून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज नागपुरातील राणी दुर्गावती चौक, कांजी हाउस चौक, कमाल चौक, इंदोरा बौद्ध विहार, शिवशक्ती नगर, गरीब नवाज नगर, टिपू सुलतान चौक, भांडार मोहल्ला येथे प्रत्यक्ष जाऊन भाजीपाला, फळ विक्रेत्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. रास्त दरात जनतेला जीवनावश्यक वस्तू द्या, भाजी दुकानासमोर सामाजिक अंतर ठेवा, गर्दी होणार नाही, यासाठी चुन्याने खुण(मार्किंग) करण्याचा त्यांनी सल्ला दिला. बाजारातील नागरिकांना तोंडावर मास्क लावण्यास पालकमंत्र्यांनी सांगितले.
तसेच खाजगी किराणा व धान्य दुकानांमध्ये जाऊन नागरिकांना जीवनावश्यक वस्तू रास्त दरात उपलब्ध करून द्याव्या, भाववाढ, साठेबाजी आणि काळाबाजार करू नका, असे दुकान मालकांना सांगितले. आपातकालीन परिस्थितीत जास्त दराने वस्तू विक्री करू नका, अन्यथा कारवाईस सामोर जावे लागेल असा इशारा देखील दिला.
पालकमंत्र्यांनी विविध चौक, नगर, वस्त्यातील नागरिकांशी व्यक्तिश: संवाद साधला व शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा त्यांनी विश्वास दिला. याप्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.