गौतम धोटे/आवारपूर
तालुक्यातील स्मार्ट विलेज बिबीच्या अनेक शिधापत्रिकाधारकांनी एप्रिल महिन्याचे धान्य व प्रधानमंत्री योजनेचे मोफत मिळालेले तांदूळ गरजूंना वितरित करीत मदतीचा हात देत नवीन आदर्श निर्माण केल्याने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. आता अनेक नागरिक मदतीकरिता सरसावले आहे. नांदा येथील युवक मित्रांचे मदतीने धान्यकीट तयार करुन अनेक गरजूंना घरपोच वाटप केले जात आहे. नांदा व बिबी गावातील अनेक नागरिक मदतीसाठी सरसावले आहे.
अनेक जणांनी एप्रिल महिन्याचे धान्य व प्रधानमंत्री योजनेचे मिळालेले तांदुळ नांदा येथील युवक मित्राच्या टीमला स्वेच्छेने दिले आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये याकरीता लाॅकडाऊनमूळे अनेक जणांचा रोजगार बुडाला. छोटे व्यावसायिक हतबल झाले. अनेकांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असतांना मदतीचे हात सरसावले आहेत.
माझ्या शिधापत्रिकावरील मिळणारे धान्य मी नेहमीच मोलमजुरी करणार्यांना देत असतो. नांदा येथील युवक मित्र अनेक गरजू व्यक्तींना धान्यकिट तयार करुन घरपोच देत आहे. माझे शिधापत्रिकेवरील मिळणारे एप्रिल महिन्याचे धान्य व मोफतचा तांदूळ मी स्वेच्छेने या टीमला दिले असून त्याचे मला समाधान आहे.
नांदा बिबी येथील जवळपास २३ रेशनकार्डधारकांनी त्यांना मिळालेले एप्रिल महिन्याचे धान्य व मोफत मिळालेले तांदुळ आमच्या टीमला स्वेच्छेने मोफत देऊन मोठे सहकार्य केले आहे. नांदाचे माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तथा प्रगतशील शेतकरी घागरु कोटनाके यांनी ५० किलो भाजीपाला गरजूंना वितरीत करण्याकरिता आमच्या टीमला मोफत भेट दिला. अनेकजण मदतीचा हात देत आहे.
- सुमेन्द्रसिंग ठाकूर, सामाजिक कार्यकर्ता